‘दगडूशेठ’ला 221 मिष्टान्नांचा महानैवेद्य

0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 25 हजार दिव्यांनी सजले मंदिर

पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी तब्बल 221 प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी कळसापासून गाभार्‍यापर्यंत सुमारे 25 हजार दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल, कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 126 व्या वर्षानिमित्त त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभार्‍यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला होता. कार्यक्रमाचे यंदा 20 वे वर्ष होते. अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल 221 हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात आला.