दगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल

0

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आनंदनगर परिसर हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, तेथील नियम शिथिल करण्याच्या मागणीवरून शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी प्रकरण शमवण्याच्या प्रयत्न केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आढळले असून तो परिसर सील करण्यात आलेला आहे. परंतु, परिसरातील नियम शिथिल करा, असे म्हणून शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. तेव्हा, पोलीस प्रशासन आणि नागरिक असा सामना झाला.

दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांना मुका मार लागला आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Copy