दगडफेके आणि गोरक्षक

0

गोरक्षक म्हणून आजकाल गोमांसविरोधी आक्रमक पवित्रा घेतला जात आहेत. अनेक राज्यांत व प्रामुख्याने भाजपची सत्ता असलेल्या राज्यात अशा हाणामार्‍या चालल्या असल्याच्या बातम्या झळकत असतात. पण, दिल्लीनजीक दादरी येथील अकलाख महंमदच्या घटनेनंतर अलवारची घटना वगळता, फारमोठा प्रकार घडल्याचे पुरावे कोणी देऊ शकलेला नाही. कमीअधिक प्रमाणात तशा घटना आणखीनही घडलेल्या असू शकतात. पण, ज्याप्रकारे त्याचा गाजावाजा चालू आहे, त्याकडे बघता, प्रतिदिन किमान दोन-चार हजार अशा घटना घडत असाव्यात, असेच कुणाला वाटेल. अलवारच्या घटनेचे चित्रण समोर आलेले आहे. पण, अन्य कुठल्या तत्सम घटनेचे चित्रण वा पुरावे समोर आलेले नाहीत. अगदी काटेकोरपणे बघितले तर देशभरात महिनाभरात पंधरा-वीसही तशा घटना घडलेल्या नसतील. पण, काहूर मात्र मोठे माजले आहे. हरकत नाही कुठेही एखादा माणूस जरी हकनाक मारला गेला, तरी तो मानवतेच्या विरोधातला गुन्हा म्हणावे लागेल. पण, जिथे डझनाच्या संख्येने माणसे अशीच अनाठायी मारली जातात, तिथे काय करायचे? गोरक्षकांनी कायदा हाती घेतला म्हणून गदारोळ केला जातो. पण, तसाच कायदा कायम हाती घेण्याची मोहीम आजकाल काश्मिरात चालू आहे. कुठेही पोलिसांवर हल्ले होतात आणि दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत असतात. एखाद्या भागात पोलीस वा सुरक्षा दलाचे जवान जिहादी घातपाती अतिरेक्याचा बंदोबस्त करीत असतील तर त्यांच्यावरच दगडफेक करण्याची नवी टुम निघालेली आहे. त्या दगडफेक्यांना कोणी कायदा हाती घेतला म्हणून शिव्याशाप देताना दिसत नाही. उलट त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या मनातले दु:ख समजून घ्या; असे सल्ले दिले जातात. मात्र, असे सल्ले देणारेच एखाददुसर्‍या अलवारसारख्या घटनेवरून गदारोळ करीत असतात.

कोणी वाहनातून गाय वा गोवंशाच्या पशूंना घेऊन जात असेल आणि तो दाढीवाला असेल, तर त्याच्यावर संशय घेऊन मारहाण होते. म्हणजे असे सांगितले जाते आहे. अशी गोवंशाची वाहतूक कायदेशीर असेल तर त्याच्यापाशी कागदपत्रे असायला हवीत, वगैरे युक्तिवाद ठीक आहे. अशा संशयिताला अडवून पोलिसांच्या हवाली करणे गैर नाही. पण, त्याला मारहाण करणे म्हणजे कायदा हाती घेणे आहे. हा एकूण युक्तिवाद आहे. पण मुद्दा असा की, या गोरक्षकांनी केलेली कृती वा हिंसा आणि तिकडे काश्मिरात पोलिसांवर होणारी दगडफेक; यात नेमका कोणता कायदेशीर फरक आहे? तिथे दगडफेक करणारे कायदेशीर कृती करीत असतात काय? नसेल, तर त्यांनाही कठोरपणे हाताळले पाहिजे आणि पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्यामुळे ठोकले पाहिजे; असे कोणी म्हणतो काय? जेव्हा काश्मिरातील दगडफेक्यांचा विषय येतो, तेव्हा त्यांची नाराजी समजून घेण्याचे सल्ले दिले जातात. मग तशीच गोरक्षकांची नाराजी समजून घेण्याचे आग्रह कशाला धरले जात नाहीत? कायदा मोडणारा कोणीही असो आणि त्याने कुठलाही कायदा मोडलेला असो, त्यात पक्षपात करण्याचे कारण नाही. अलवार येथे चारजण गोरक्षकांच्या हल्ल्यात जखमी झाले आणि काश्मिरात झाली त्या दगडफेकीत एक नागरिक ठार, तर साठहून अधिक पोलीस जखमी झाले. अलवारच्या बाबतीत पोटतिडकीने बोलणार्‍यांपैकी कितीजणांनी काश्मिरातील दगडफेकीत पोलीस जखमी झाल्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती? केलेली नसेल, तर त्यापैकी कोणालाही अलवार प्रकरणात बोलण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार उरत नाही. कायद्याचे राज्य राजस्थान वा कुठल्या भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात असायला हवे आणि काश्मिरात मात्र अराजकालाच सुव्यवस्था समजावे; असे म्हणता येणार नाही. पण, अशा विरोधाभासाला आजकाल शहाणपणा समजले जात असते.

लोकशाहीत बहुमताचे राज्य असले तरी अल्पमताचा आवाज दडपला जाता कामा नये, असा दंडक आहे. तोच संकेत दीर्घकाळ पायदळी तुडवला गेला आहे. बहुमताने इथे सेक्युलर म्हणून ज्या शब्दाचा अखंड वापर झाला, त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. पुरोगामी म्हणजे अल्पसंख्य मनोवृत्तीने बहुसंख्य समाजावर कुरघोडी करणे हे लादले गेले आहे. त्याची प्रतिक्रिया दिवसेंदिवस उमटत चालली आहे. मग वंदे मातरम् नाकारणे असो, किंवा एखाद्या शाकाहारी वसाहतीमध्ये सक्तीने मांसाहाराचा आग्रह धरण्याचा विषय असो. या पक्षपाताने अल्पसंख्याकाविषयी किल्मिष वाढत गेलेले आहे. भारतात नाही तर गोरक्षा अन्य कुठल्या देशात होऊ शकते? पण इथे गोरक्षा हा गुन्हा ठरवला जातो आणि अल्पसंख्याकाच्या भावनांना चुचकारले जाते. त्याला कायद्याचेही संरक्षण देण्याचा आटापिटा चालतो. त्यातून मग कायद्यालाही धाब्यावर बसवण्याची प्रवृत्ती बोकाळत गेलेली आहे. काश्मिरात दगडफेक करूनही त्यामागची भावना समजून घेणार असाल, तर गोरक्षकांची हिंसाही समजून घ्यावी लागेल. कायद्याची महत्ता समान वागणुकीत असते. एकाच बाजूला पक्षपाती संरक्षण देण्यातून वा पाठीशी घालण्यातून कायद्याची प्रतिष्ठाच लयाला जात असते. जाती-पातीच्या पलिकडे जाऊन हिंदू समाजात मतदान त्यामुळेच होऊ लागले आहे. हिंदूराष्ट्र अशी भाषा आता बोलण्याचीही गरज राहिलेली नाही. भारतात हिंदू एकवटू लागला आहे आणि त्याला असलाच पुरोगामी पक्षपात कारणीभूत झाला आहे. गोरक्षकांच्या हिंसाचारावर बोलणार्‍यांनी काही वर्षांपासून काश्मिरात चाललेल्या हिंसाचाराला निर्दयपणे चिरडून काढण्याची भाषा बोलली असती, तर कुठल्याही राज्यात गोरक्षकांना कायदा हाती घेण्याची हिंमत झाली नसती. स्वातंत्र्योत्तर काळातील इतक्या वर्षात अशा घटना घडल्या नाहीत. आजच अशा घटना का वाढीस लागल्या आहेत? त्याचे उत्तर पक्षपाती पुरोगामित्वात दडलेले आहे.

गेल्या दोन-चार दिवसांत सातत्याने अलवारच्या एका घटनेचा गाजावाजा चालू आहे. मागल्या दहाबारा वर्षात मालेगावच्या एका घटनेचा संदर्भ धरून हिंदू दहशतवादाचे नाटक रंगवले गेले. शंभर जिहादी घटनांच्या तुलनेत मालेगावची एक घटना जेव्हा गाजवली जाते; तेव्हा त्यातून बहुसंख्य हिंदू समाजात संतापाची लाट आकार घेऊ लागते. काश्मिरात भारतीय सेनेवरच दगड मारून पाकिस्तानी घुसखोर अतिरेक्यांना वाचवण्याचा प्रयास होतो. त्यावर मौन धारण केले जाते, तेव्हा हिंदू समाजाला आपण आपल्याच देशात पिडीत असल्याची धारणा वाढीस लागत असते. त्यात कायदा आपल्या बाजूने उभा रहात नसेल, तर कायदा झुगारण्याला चालना मिळत असते. हे काम शासकीय यंत्रणा वा कायदा करू शकत नाही, अशी धारणा झाली, मग कायद्याची प्रतिष्ठा व दबदबा धुळीस मिळत असतो. ही समस्या समजून घेतली तरच त्यावरचा उपाय सापडू शकेल. त्यातला पक्षपात ही खरी समस्या आहे. म्हणून तर दादरीतील अखलाखच्या हत्येवर काहूर माजवूनही भाजपाला उत्तर प्रदेशात इतके मोठे यश मिळू शकले. कारण आता हिंदुत्वाच्या धर्मांधतेचा आरोप बहुसंख्य लोकांना गुन्हा वा लज्जास्पद कृत्य वाटेनासे झाले आहे. त्याचीच प्रतिक्रिया देशाच्या सर्व प्रांतामध्ये उमटू लागली आहे. म्हणूनच पक्षपात सोडून, दगडफेक्यांशी गोरक्षकांची तुलना करून, दोन्हीकडे कठोर कारवाईची मागणी पुरोगामी गोटातून येत नाही, तोवर असे प्रकार थांबणार नाहीत. उलट वाढत जातील. कारण ज्याला तुम्ही गुन्हा ठरवत आहात, तो बहुसंख्य समाजातील अनेक लोकांना आता पुरुषार्थ वाटू लागला आहे. दुर्दैवाने त्यातला बळी मुस्लीम होत चालला आहे. पुरोगाम्यांनी या देशातील सामान्य निरपराध मुस्लिमाला पाकवादी व जिहादी म्हणूनच पेश करण्याच्या पापकर्मातून अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.