‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिकेचा प्रस्ताव

0

पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) देण्याची मोहीम राबवली जात असून त्या अंतर्गत ‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. या प्रस्तावानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ ठेवण्याची हमी दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने सोमवारी मंजुरी दिली आहे.

आता हा प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात आला असून त्यावर 27 नोव्हेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील शहरे कचरामुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने स्टार रेटिंगची संकल्पना जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करून त्यांना थ्री स्टार, फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार रेटिंग दिले जाणार आहे. त्यापैकी काही रेटिंगचे मूल्यांकन राज्य सरकार करणार असून, उर्वरित रेटिंगचे मूल्यांकन केंद्र सरकारच्या वतीने त्रयस्थ संस्था करणार आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन, निर्मितीच्या जागी कचर्‍याचे वर्गीकरण, सार्वजनिक, व्यावसायिक व निवासी भागातील दैनंदिन साफसफाई, कचर्‍यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करणे, स्वच्छतेसंदर्भातील ऑनलाईन तक्रारींचे निवारण करणे, नदी, नाले, तलावांची स्वच्छता करणे, शहरातील नागरिक व संस्थांना यूजर चार्जेस लागू करणे आणि प्लास्टिक बंदी लागू करणे, आदी निकषांच्या पाहणीच्या आधारे हे रेटिंग दिले जाणार आहे. त्यानुसार थ्री स्टार रेटिंगसाठी आवश्यक निकषांची शंभर टक्के पूर्तता करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ ठेवण्याची हमी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव पाठविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्या संदर्भातील प्रस्तावाला महिला व बाल कल्याण समितीने मंजुरी दिल्याचे समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी सांगितले.