थ्री फेज कृषी पंपांसाठी 16 तास वीजपुरवठा होणार

0

मुक्ताईनगर। महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या शेती पंपास 18 तास वीज पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सततच्या भारनियमनामुळे दिवसातून केवळ 2-3 तासच विजेचा पुरवठा होत असल्याने शेतीपिके पाण्याअभावी नष्ट हावून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना कृषीपंपासाठी 18 तास सुरळीतपणे वीज पुरवठा होवून आश्‍वासनाची पुर्ती होणे गरजेचे होते.

सततच्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी कृषी पंपास पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेवून निवेदन दिले.

आमदार एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांना यश
भारनियमनामुळे शेतकर्‍यांच्या कृषी पंपास वीज पुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांच्या पीक नुकसानीची गंभीर समस्या लक्षात घेवून आमदार एकनाथराव खडसे यांनी अखंडीत वीज पुरवठा देण्याबात महावितरण संचालक अभिजित देशपांडे, वाणिज्य वीज भारनियमनचे कार्यकारी संचालक सतिश चव्हाण यांच्याशी चर्चा करुन अखंडीत वीजपुरवठा देण्यासंदर्भात सुचना केल्या. त्यानुसार महावितरण कंपनीकडून मुक्ताईनगर, सावदा व भुसावळ विभागातील गावांना थ्री फज कृषी पंपासाठी दिवसा आठ तास व रात्री आठ तास असा 16 तास अखंडीत वीज पुरवठा देण्यात येईल तसेच मुक्ताईनगर, सावदा, भुसावळ या हेवी लोड विभागात शक्यतो कमी प्रमाणात लोडशेडींग करण्यात येईल. अत्यंत आवश्यकता भासल्यास झिरो लोडच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. अन्यथा सुरळीतपणे 16 तास वीज देण्याचेही आश्‍वासन महावितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकरी वर्गाास थ्री फेज कृषी पंपासाठी दिवसा आठ तास व रात्री आठ तास असा 16 तास अखंडीत वीज पुरवठा होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.