थेरोळा शिवारात वीज पडल्याने चार बकर्‍यांचा मृत्यू

मुक्ताईनगर : तालुक्यातील पूर्णा नदी काठी बकर्‍या चराईसाठी आणल्या असता याचवेळी मेघगर्जना होवून वीज कोसळल्याने चार गर्भधारणा झालेल्या बकर्‍यांचा मृत्यू झाला तर आठ बकर्‍या अपंग झाल्याची घटना बुधवारी, 19 रोजी घडली. या घटनेमुळे अनिल दशरथ मदने यांचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी शुभम अनिल मदने हा आपल्या स्वतःच्या बकर्‍या चराईसाठी पूर्णा नदीच्या काठी असलेल्या सुभाष तायडे यांच्या शेतात घेवून गेला असता दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाड होवून वीज कोसळल्याने गर्भधारणा झालेल्या चार बकर्‍यांचा मृत्यू झाला तर शुभम अनिल मदने हा बालंबाल बचावला. या घटनेत आठ बकर्‍या अपंग झाल्या. याबाबतची माहिती कळताच विशाल महाराज खोले यांनी पाहणी करीत तहसीलदार श्वेता संचेती यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले. प्रसंगी विशाल महाराज खोले, मनोज हिवरकर, पोलिस नाईक रवींद्र सपकाळे, थेरोळा पोलिस पाटील समाधान भोंबे, कुर्‍हा काकोडा येथील पोलिस पाटील विजय पाटील उपस्थित होते.