थेट लाभ हस्तांतरण कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली

0

मुंबई: विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने 18 अतिरिक्त वस्तूंचा समावेश करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने दि. ३ मार्च २०१७ रोजी निर्गमित केला आहे.

शासन थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना योजनांचा पूर्णपणे लाभ मिळेल व अनावश्यक गोष्टी टळू शकतील. यासंबंधीचा पहिला शासन निर्णय नियोजन विभागाने दि. ५ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित केला होता. त्यामध्ये सुरुवातीला शासनाच्या विविध विभागांमार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या ४४ साधनसामग्रीची यादी निश्चित करण्यात आली होती. आता या यादीची व्याप्ती वाढवण्यात आली असून त्यात आणखी १८ बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

नियोजन विभागाने दि. ५ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये जनावरांचे खाद्य वाटप, विजेवर चालणारे वैरण कापणी यंत्र, मासेमारीकरिता प्रगत यंत्रसामुग्री पुरविणे, कृषी अवजारे पुरविणे, मायक्रो ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, बियाणे लघु हत्यारे वितरण, मधपेट्या यंत्र वाटप, गणवेश व साडी वाटप, सायकल वाटप, पावर टिलर पुरविणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, स्वयंपाकाचा गॅस व सौरकुकर, सामुहिक विवाहाप्रसंगी वस्तू देणे, महिला बचत गटांना मोबाईल व्हॅन पुरविणे, बियाणे पुरवठा व वाटप, पीक संरक्षण उपकरणे, कामगंध सापळे, किटक नाशके, पाईपलाईन, ताडपत्री, लघुअंडी उबविणारी यंत्रे, मुरघास तयार करण्याचे युनिट, मासेमारी साधने, कुक्कुटपालनाची शेड, बकऱ्यांसाठी शेड, कृषी पंप, वीज पंप, ऑईल इंजीन, यांत्रिकीकरण संबंधी साहित्यपुरवठा, पाठ्यपुस्तके, गाईड्स, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, चष्मा, विद्यार्थ्यांना टॅब व लॅपटॉप वाटप, मोबाईल फोन वाटप, छत्री व रेनकोट, कांडप यंत्र, अपंग व्यक्तींना देण्यात येणारे साहित्य यामध्ये श्रवणयंत्र, तीनचाकी सायकल, काठी इ. पिको फॉल मशिन, शाळेचे दप्तर, पादत्राणे, रोटाव्हेटर, एचडीपीई पाईप या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.

आता दि. ३ मार्च २०१७ रोजीच्या शासननिर्णयान्वये आणखी 18 बाबींची भर पडली आहे. यात प्रामुख्याने कृषी निविष्ठा यामध्ये (जैविक/ सेंद्रीय खते, सूक्ष्म मूलद्रव्ये व अन्य), भूसुधारके (जिप्सम व अन्य), सूक्ष्म सिंचन साधने (ठिबक/तुषार व अन्य), शेळ्या, मेंढया व कोंबडया व त्यांच्या संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायीसाठीचे साहित्य, संरक्षित शेतीसाठीचे साहित्य, आच्छादन व अस्तरीकरण साहित्य, एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापन साठीच्या निविष्ठा, कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे, रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री, आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे, स्वेटर, शाल, साबण, हेअर ऑईल, झेरॉक्स मशिन, टिनपत्रे या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.