थापा, संगवान, फंगाल जागतिक स्पर्धेसाठी पात्र

0

ताश्कंद। ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित करतानाच शिवा थापा, सुमीत संगवान, अमित फंगाल यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. या तिघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली आणि त्यांचे पदक पक्के झाले. 91 किलो वजनी गटातून खेळणार्‍या सुमीतने तृतीय मानांकित फेंगकाईवर 4-1 असा विजय मिळवला.

उपांत्य फेरीत सुमीतसमोर ताजिकिस्तानच्या जाखोन कुबरेनोव्हचे आव्हान असणार आहे. कुबरेनोव्हने पाकिस्तानच्या मेहमूद सनाउल्लाचा धुव्वा उडवला. 49 किलो वजनी गटातून खेळणार्‍या अमितने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या कॉर्नेलिस क्वांगू लांगूला 4-1 असे नमवले. उपांत्य फेरीत अमितसमोर उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबॉय दसमॅटोव्हचे खडतर आव्हान आहे. तिसर्‍या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे पदक पक्के करताना शिवाने तैपेईच्या च्यु इन लाइवर मात केली. शिवाने 2013 आणि 2015 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदकाची कमाई केली होती. उपांत्य फेरीत शिवासमोर अव्वल मानांकित चिनझोरिग बातारसुखचे आव्हान असणार आहे.