थापा नको, कर्ज माफीचा ठराव मांडा!

0

मुंबई ।शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याशिवाय आता सरकारसमोर पर्याय नाही. आम्ही उद्दिष्टाच्या जवळ असून आता थापा नको तर एका ओळीत ठराव मांडा अन्यथा कामकाज होऊ देणार नसल्याची आक्रमक भूमिका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे उपस्थित होते.

मार्च 2017 पूर्वी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने याआधी दिले होते. सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नाही. पुण्यात ज्यावेळी बाबा आढाव यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन केले होते त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी लेखी स्वरूपात मागण्या मान्य करून मार्च 2017 पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झाले नाही. सरकार अशा प्रकारे शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे.
– राधाकृष्ण विखे-पाटील, विरोध पक्षनेते, विधानसभा

सरकारची आर्थिक परिस्थिती प्रथमदर्शनी चांगली दिसत असून खर्चाची प्राथमिकता ही कष्टकरी वर्ग असणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी सरकार आता बँकांचे कारण पुढे करत आहे. बँकांचा प्रॉब्लेम असेल तर शेतकर्‍यांच्या हातात पैसे द्यावेत. कर्जमाफी हा केंद्राचा मुद्दा असल्याचे सांगत अर्थमंत्री मुनगंटीवार दिशाभूल करत आहेत. आता दिल्लीत चर्चा करू, केंद्रात जाऊ, तुम्ही आमच्यासोबत चला, अशा थापा न देता कर्जमाफीचा एका ओळीत ठराव मांडा.
– जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.