त्रिवेंद्रसिंह रावतांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

0

देहरादून : उत्तराखंड विधानसभेवर भाजपने भगवा फडकविल्यानंतर शनिवारी त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल डॉ. के. के. पॉल यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधानांनी राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्यात.

सात कॅबिनेट, दोन राज्यमंत्र्यांचा शपथविधी
शनिवारी छोटेखानी समारंभात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीतच राज्यपालांनी मुख्यमंत्री रावत यांच्यासह सात कॅबिनेट व दोन राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देहरादूनच्या परेड ग्राउंड येथे हा सोहळा पार पडला. सत्पाल महाराज, प्रकाश पंत, हरकसिंह रावत, मदन कौशिक, यशपाल आर्य यांना कॅबिनेट तर रेखा आर्य, धनसिंह राव यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शपथविधीनंतर मोदी पुन्हा राजधानी दिल्लीकडे रवाना झाले. सायंकाळी कॅबिनेटची पहिली बैठकही पार पडली.

मावळते मुख्यमंत्र्यांचीही हजेरी
शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांचे जोलिग्रांट विमानतळावर राज्यपाल डॉ. के. के. पॉल, भाजप विधिमंडळ नेते त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केले. मोदी यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती, जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही उपस्थिती होती. भाजपचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक, भुवनचंद्र खंडूडी, भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मावळते मुख्यमंत्री व काँग्रेस नेते हरीश रावत यांनीही शपथविधी सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली व नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्यात.