‘त्या’ 17 जणांचा मृत्यू इतर आजारांनी की ‘सारी’नेच ?

0

जळगाव– जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. नेमके कुठलेही ठोस कारण नसतांनाही सर्वांचा मृत्यू सारी या आजाराने झाल्याची बोंब फुटली. मात्र ठोस कारण नसल्याने संबंधित सर्वांचा मृत्यू सारी आजारानेच झाला यावर आरोग्य यंत्रणा अजून ठाम नाही. आधीच जळगाव जिल्ह्यावर कोरोनाचे संकट असतांना दुसरीकडे कुठलाही अधिकृत वैद्यकीय दुजोरा न घेता संबंधिताचा मृत्यू सारी या आजाराने झाल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. दरम्यान या संवेदनशील बाबीची जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने गंभीर दखल घेत संबंधित सर्वांचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला? त्याची कारणे कोणती?, मागील वर्षी काही असे मृत्यू झाले का? याचा शोध घेण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले आहे. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली असून आठवडाभरात सर्वांच्या मृत्यूची ठोस कारणे समोर येणार आहेत

जिल्हा रुग्णालय कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्यास रुग्णांना जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल करुन घेण्यात येते. उपचारादरम्यान वेगवेगळ्या दिवशी तसेच वेगवेगळ्या कारणांनी दरम्यानच्या काळात 17 जणांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला. यापैकी काहिंना सारीच्या आजार सदृश्य लक्षणे होती. त्यामुळे संबंधितांचा मृत्यू सारीनेच झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र यावर आरोग्य यंत्रणा ठाम नाही.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक

कोरोनाशी दोन हात करण्यात आधीच यंत्रणा व्यस्त आहे. त्यातच सारीने 17 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्या बाबीची गंभीर दखल घेतली. तसेच जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह कर्मचार्‍यांची बैठक घेतली. त्यात संबंधित मृत्यूच्या विविध कारणांबाबत चर्चा झाली. चर्चेनंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी डॉ. खैरे यांना संबधित सर्वांच्या मृत्यूच्या नेमक्या व ठोस कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

मृत्यूच्या कारणांच्या शोधार्थ यंत्रणा कामाला

याबाबत चौकशी साठी शासनाची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. समितीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यातही संबंधित विषयावर चर्चा झाली. यानंतर डॉ. खैरे यांच्यासह यंत्रणा तातडीने संबंधितांच्या मृत्यूचे नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी कामाला लागली आहे. सर्वाच्या मृत्यू कसा झाला, त्याला नेमका आजार काय होता, त्या आजारानेच मृत्यू झाला की इतर कारणांनी अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे वैद्यकीय टीमव्दारे शोधली जात आहेत. लवकरचचौकशीअंती संबधित सर्वांच्या मृत्यूची व ठोस कारणे समोर येणार आहेत.

ते प्रमुख डॉक्टर कोण?

मात्र अद्यापही सारीने मृत्यू झाल्याबाबत आरोग्य यंत्रणा ठाम नाही. असे असतांनाही काहींनी सारीनेच मृत्यू झाल्याबाबत जिल्ह्यात संभ्रम निर्माण केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. एकीकडे जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांमध्ये भिती निर्माण होवू असे कोणतेही कृत्य करण्यास अथवा वृत्त छापण्यास मनाई आदेश काढले आहेत. संवेदनशील बाब असतांनाही तसेच कुठलेही ठोस कारण समोर नसतांनाही सारीनेच मृत्यू झाल्याबाबतची प्रतिक्रिया देणारे ते प्रमुख डॉक्टर कोण? याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. कारण जबाबदारी असलेलेच व्यक्ती भिती निर्माण करण्यात सहभागी होत असतील? त्याच्यावर कारवाई व्हावी असाही सूर व्यक्त होत आहे.

17 जणांचा किंवा त्यापैकी काहींचा मृत्यू सारी आजारानेच झाला हे ठामपणे सांगता येणार नाही. संवदेनशील बाब आहे. केवळ लक्षणे सारखी असली म्हणून ते सारी या आजारानेच मरण पावली असे म्हणता येणार नाही. आम्ही प्रत्येकाच्या मृत्यूचे अ‍ॅनॅलिसीस करत असतो. जिल्हाधिकार्‍यांनी संबधिताच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामाला लागलो आहोत. लवकरच चौकशी तसेच अभ्यासाअंती मृत्यूचे नेमके व ठोस कारण समोर येईल. अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये.

– डॉ. भास्कर खैरे, अधीष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Copy