‘त्या’ पाच निरागस जीवांचा काय दोष?

0

जळगाव शहरापासून अवघ्या 14-15 किलोमीटर अंतरावरच्या भादली बुद्रुक गावात कुडाच्या घरात राहणार्‍या भोळे कुटूंबावर 20 मार्च रोजी रात्री अज्ञातांनी घरातील चार जणांची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात पती पत्नीसह त्यांच्या दोन निरागस बालकांचे बळी गेले. त्यांच्यावर एवढा घाव होता की जिल्हा रूग्णालयात मृतदेह नेताना गुंडाळलेल्या चादरीमधूनही रक्त पडत होते. या घटनेबाबत असोदा, भादली व शहरात चर्चा होत असतांना जिल्हा रुग्णालयातील मृतांंचे नातेवाईकही हळहळ व्यक्त करीत होते. या लहानग्यांबाबत चर्चा होऊन एवढ्या लहान मुलांना मारण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ही वार्ता वार्‍यासारखी पसरून परीसर सुन्न झाला होता.

दुसर्‍या घटनेत धुळे शहरातील पाचकंदील येथे राहणारे मारूती मंदिराचे पुजारी शर्मा यांच्यासह पत्नी, आई, मुलगा व मुलगी 26 मार्च रोजी मध्यरात्री गाढ झोपेत असतांना अचानक शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत होरपळून दुदैवी अंत झाला. या घटनेतही निरागस बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांच्या कारवाईनंतर नातेवाईकांनी दोन जणांवर संशय व्यक्त करीत दोघांनीच घराला आग लावल्याचा आरोप केला . या घटनेतही घातपात झाल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अजूनही घातपातचे कारण गुलदस्त्यातच आहे.

31 मार्चच्या मध्यरात्री जळगाव रेल्वे स्थानकावर थांबलेल्या पती पत्नीमध्ये वाद होत असतांना अचानक भरधाव रेल्वे गाडीसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व सोबत असलेला चार वर्षांच्या त्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही घटनांचा नुसता विचारही केला तर डोकं े सुन्न होतं. हरामखोर हल्लेखोर निरपराध मुलांना कसे काय मारू शकतात?, त्यांच्या मनात लहान मुलांविषयी काय भावना असेल, अशा घटनांमुळे कुटूंबात होणारे वादविवाद दाम्पत्यावर कसे विपरीत परिणाम करतात, तू असं केलं तर मी अमूक करेल, तू तसं केलं तर मी तमूक करेल, अशा धमक्या एकतर बायको नवर्‍याला देते नाहीतर नवरा बायकोला देतो. माझाही आठवड्यातून एकदातरी पत्नीशी वाद होतो, मात्र मी त्यावेळी माझ्या मुलांकडे बघून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. कारण संताप ऐनवेळी कोणती भूमिका घईल, हे मात्र सांगता येत नाही, हे वडीलधार्‍यांचे समंजसपणाचा संस्कार रुजविणारे बोल गीतेसारखेच मोलाचे वाटतात!

जितेंद्र कोतवाल – 9730576840