‘त्या’ अपघातातील ट्रेलर चालकाचा जामीन मंजूर

0

जळगाव । शिवकॉलनी स्टॉपजवळ सोमवारी तरूणाचा ट्रेलरखाली चिरडून मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रेलरचालकाविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ट्रेलरचालकास पोलीसांनी त्याचवेळी अटक केली होती. आज पोलीसांनी ट्रेलरचालकास न्या. के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली.

ट्रकचालकास कुळकर्णी यांच्या न्यायालयात केले हजर
मित्रांना संभाजीनगर येथे सोडून आल्यानंतर कुंदन प्रतापराव पाटील हा तरूण शिवकॉलनी स्टॉपसमोरील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढल्यानंतर घरी परतत असतांना सीजी. 04. जेबी. 6092 ह्या ट्रेलरने त्याला धडक दिल्यानंतर कुंदन याचा टे्रलच्या चाकाखाली येवून मृत्यू झाला होता. याचवेळी पोलीसांनी ट्रेलरचालक गुड्डु यादव या चालकास ताब्यात घेत अटक केली होती. तर याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चालकाविरूध्द अश्‍विन मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मंगळवारी रामानंद नगर पोलीसांनी ट्रेलरचालक गुड्डु यादव याला अपघात प्रकरणी न्या. के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. यावर न्यायालयात कामकाज होवून संशयित गुड्डु यादव याचा 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी आरोपीपक्षातर्फे अ‍ॅड. राशिद पिंजारी यांनी काम पाहिले.