…त्यांना औकात दाखवूः मुख्यमंत्री

0

मुंबई । महाभारताप्रमाणे आजकाल शिसेनेत दुर्योधन आणि शकुनी मामांचे चालत आहे, अशा शकुनीमामांना त्यांची औकात दाखवू, आज पाणी पितोय मात्र 21 तारखेला त्यांना पाणी पाजू, असा सडेतोड जबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संकल्प मेळाव्यात दिला. उध्दव ठाकरेंनी युती तोडण्याची घोषणा करताना भाजपवर केलेल्या हल्ल्याचा समाचार मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज घेतला. गोरेगावात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या अजेंड्यावर कसलीही तडजोड नाही, असे खडे बोल त्यांनी शिवसेनेला सुनावले.

युतीमध्ये शिवसेना 141 आणि भाजप 127 जागांवर लढण्याचे ठरले होते. आम्ही जागा नव्हे तर पारदर्शीपणावर युतीसाठी अग्रेसर होतो. मात्र शिवसेना 151 जागांवर अडून बसली आणि शिवसेनेने युती तोडली. युतीत सडलो म्हणणारे 25 वर्ष आमच्या पाठिंब्याने महापौरपदी बसले. मात्र 25 वर्षात मुंबईचे आणि मुंबईकरांचे नुकसान केले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका करत, चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने युती तोडल्यानंतर, तुम्ही काय उत्तर देणार असे मला लोक विचारत होते. मात्र आम्ही जुगलबंदी किंवा मनोरंजन करणारे लोक नाही, आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे लोक आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली.

छत्रपतींच्या नावाने खंडणी वसुली चालणार नाही
सत्तेत येऊन छत्रपतींचे नाव घेत हाती भगवा घेऊन खंडणी वसुली करणे हे कदापी खपवून घेणार नाही, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना नेते म्हणाले, मुंबई पालिकेत पारदर्शीपणा हवा असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारमध्येही हवा. मी सांगेन की तुम्ही सांगाल तेवढा पारदर्शीपणा राज्य सरकारमध्ये आणायची माझी तयारी आहे, तुम्ही सांगा आपण आणखी पारदर्शी कारभार करु, असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही म्हणता करुन दाखवले, पण ते तुम्ही स्वत: म्हणून नका. एखादे काम केलात तर जनता स्वत:च म्हणेल, होय तुम्ही करुन दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही, मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा 22 किलोमिटरचा सागरी सेतू आपण बांधतोय, मुंबईतील झोपडपट्टीतल्या 60 टक्के जनतेसाठी काम करायचे आहे, आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचे आहे, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क उभे केले, शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही, अशी फटकेबाजी त्यांनी केली.

युती तुटली नसती तर मुख्यमंत्री झालो नसतो
शिवसेने युती तोडली. मात्र यापूर्वी शिवसेनेने युती तोडली नसती तर मी कधीच मुख्यमंत्री झालो नसतो, युती तुटली म्हणूनच आमची ताकद समोर आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून भाजपची ताकद दिसली, पण तरीही मुंबई महापालिका युतीसाठी माघार घेतली. युतीसाठी पारदर्शीपणा ही एकच अट ठेवली, पारदर्शीपणा ही माझी चूक आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

सेनेला अफझलखान आणि रावणाची उपमा
शिवसेनेवर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. अफझलखान, कौरव आणि रावणाची उपमा त्यांनी शिवसेनेला दिली. शिवसेना अहंकाराने माजलेल्या रावणासारखी झाली आहे. त्या अहंकाराचा पराभव होईल. मुंबईशी आमचे नाते विकासाचे आहे, असे म्हणत त्यांनी व्यासपिठावर बसलेले सगळे मुंबईकर असल्याचा दाखला दिला. जाहिरनाम्याच्या मुद्यावर आम्ही निवडणुक लढवू असे ते म्हणाले. शिवसेनेच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक आणि शिवस्मारक याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दोन्ही स्मारकांचे काम पुर्ण करतील. जो मै बोलता हूं वो मै करता हूं और जो नही बोलता हूं वो मै डेफीनेटली करता हूं

शिवरायांना मोदींचं नमन
शिवसेनेने स्वबळाचे रणिशग फुंकल्यानंतर आता भाजपही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भाजपचा आज मुंबईतील गोरेगावात विजय संकल्प मेळावा झाला. त्या मेळाव्यातील व्यासपीठावरील पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेच फोटो होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडून नमन करत आहेत, असे एक चित्र तर पोस्टरच्य एका कोपर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय पोस्टरवर कुणालाही स्थान देण्यात आले नव्हते. अगदी भाजपच्या मुंबई अध्यक्षांनाही पोस्टरवर जागा देण्यात आली नव्हती.