तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांकडून आता सोन्याची मिशी अर्पण

0

हैदराबाद। तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता भगवान वीरभद्र स्वामी मंदिरातील आपला नवस पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. महबूबाबाद जिल्ह्यातील कुरावी येथे असलेल्या या मंदिरात सोन्याची मिशी अर्पण करुन ते आपला नवस फेडणार आहेत. यापूर्वी राव यांनी अनेक प्रतिष्ठित मंदिरात सोन्याच्या महागड्या वस्तू अर्पण केल्या आहेत. 22 फेब्रुवारी रोजी के. चंद्रशेखर राव यांनी तिरूमला येथील प्रसिद्ध वेंकटेश्वरला (बालाजी) पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले होते.

भगवान वेंकटेश्वरांचे दर्शन घेतल्यावर राव यांनी शंखशिंपल्यांनी जडित सोन्याचा हार ( शालिग्राम हारम) व अनेकपदरी सोन्याचा मखर कांताभरनम (नेकलेस) मंदिराचे कार्यकारी अधिकारी डी. सांभशिव राव यांच्याकडे सुपूर्द केला, असे मंदिराच्या सूत्रांनी सांगितले होते. या हारांचे वजन 19 किलो व किमत पाच कोटी रुपये आहे.

दरम्यान, स्वत:च्या प्रतिज्ञा वा नवस पूर्ण झाले, म्हणून सरकारी खर्चातून हे करणे चुकीचे आहे, असेच मत अनेकांनी व्यक्त केले होते. यामुळे चंद्रशेखर राव यांनी हे दान केल्याने टीकेचे धनी झाले आहेत. राव सरकारी पैशांची नासाडी करत असल्याचा आरोप केला जात आहे. आपले वैयक्तिक नवस पूर्ण करण्यालाठी सार्वजनिक निधीमधील पैसा वापरला जात असल्याचं विरोधकांचे म्हणणे आहे.

यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये चंद्रशेखर राव यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात 11.2 किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला होता, ज्याची किंमत 3.5 कोटी रुपये होती.