तेजस्विनी बस तपासणीचे काम लवकरच सुरू होणार

0

तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन

पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बसेस तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन करण्यात आले आहे. चार महिलांचा समावेश असलेल्या या पथकाला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे पथक पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने (पीएमपी) महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी खास तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. अल्पावधीतच या बससेवेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या एकूण 9 मार्गांवर 28 बसेसमार्फत तेजस्विनीची सेवा दिली जात आहे. दैनंदिन आठ ते दहा हजार महिलांना या सेवेचा लाभ होत आहे. मात्र, काही महिला प्रवाशांकडून तेजस्विनी बससेवेचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास केल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर कारवाईसाठी प्रशासनातील तिकीट तपासणी पथकाला मर्यादा येत असत. काहीवेळा महिलांकडून जाणीवपूर्वक वादावादी केल्याचे प्रकरण समोर आले होते. यातूनच महिला पथक स्थापन करण्याची कल्पना समोर आली. यानुसार प्रशासनाने सेवेतील चार वरिष्ठ वाहक महिलांना सेवा ज्येष्ठतेनुसार या पथकात स्थान दिले आहे. सुरुवातीला चार महिने प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार असून यानंतर तिचे परीक्षण करून निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रथमच असे महिला पथक स्थापन करण्यात आल्याने महिला प्रवाशांकडून याचे स्वागत केले जात आहे.

प्रशासनाकडून प्रथमच असे महिला पथक स्थापन करण्यात आल्याने त्यांना कशा पद्धतीने काम करायचे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान अनुभवासाठी पुरुष तपासणी पथकाबरोबर काम देण्यात आले होते. तसेच, आता स्वतंत्र वाहन तपासणीचे काम देण्यात येणार आहे. कंडक्टरप्रमाणेच त्यांना खाकी गणवेश असणार आहे.

Copy