तुरळक गोंधळानंतर विधानपरिषद सुरुळीत

0

 

नागपूर(निलेश झालटे ) : हिवाळी अधिवेशन समाप्तीकडे सरकत असताना चर्चेचा महापूर विधानपरिषदेत वाहत असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. जानकरांच्या विषयावरून झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज अत्यंत सुरळीत पार पडले. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यानंतर जानकर यांना निलंबित करून राजीनामा देण्याची मागणी करत विरोधी पक्षाने दुपारच्या सुमारास सभागृहात गोंधळ घातला. अर्धा तासाच्या गोंधळातच अहवाल पटलावर ठेवले गेले. यानंतरही गोंधळ थांबत नसल्याने सभापतींनी अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब केले. यानंतर मात्र विशेष बैठक, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, औचित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा विधानपरिषदेत पार पडली. यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णयदेखील घेण्यात आले असून यातील काही मुद्द्यांवर त्वरित अमलबजावणी करण्याचे आदेश सभापतींनी शासनाला दिले.

त्याकॉन्स्टेबलची गय केली जाणार नाही

अमरावती जिल्ह्यातील मूळची रहिवासी असलेली पोलीस कॉन्स्टेबल माधुरी साळुंकेच्या हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सूरज माळी व त्याचा मित्र कुणाल साळुंखे यांच्यावर योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. विधानपरिषदेत लक्षवेधी अंतर्गत भाई जगताप यांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास झालेला विलंब आणि पुरावे असताना सीआयडीकडे तपास दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात मृत माधुरीच्या बहिणीची तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दल संताप व्यक्त करत तात्काळ कारवाई करण्याची मागणी विद्या चव्हाण यांनी केली. यावेळी उत्तर देताना रणजित पाटील यांनी आरोपी पोलीस असल्याने कुठल्याही प्रकारची गय न करता निर्धारित वेळेत सीआयडीकडून चौकशी करून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे सांगितले. उपसभापतींनी देखील हे प्रकरण गंभीर असून निर्णय लवकर घेण्याचे निर्देश दिले.

भटक्या कुत्र्यांसाठी श्वानगृह उभारून निर्बीजीकरनावर भर देणार

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षात 13 लाख नागरिक जखमी झाले असून 134 लोकांचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला असल्याने अशा कुत्र्यांवर अंकुश आणण्याच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत जगन्नाथ शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. तसेच खोटी माहिती देणाऱ्या एनजीओवर कारवाई करण्याबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर रणजित पाटील यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी श्वानगृह उभारून निर्बीजीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच सगळ्या अर्बन व लोकल स्तरावर अँटी रेबीजची औषधे मोठ्या प्रमाणावर वितरित केल्याची माहिती दिली. तसेच खोट्या एनजीओवर नियंत्रण आणण्यासाठी समिती गठीत केली असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली.

 राज ठाकरे म्हणजे नवीन सेन्सॉर बोर्ड!

चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी राज ठाकरे हे सरकार द्वारे नियुक्त नवे सेन्सॉर बोर्ड चालवीत आहेत का? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे हे समांतर सरकार चालवीत असल्याची टीका काँग्रेसचे संजय दत्त यांनी सरकारवर केली. चित्रपट प्रदर्शनाच्या आधी दिग्दर्शक आणि अभिनेते घाबरून राज ठाकरे यांना का भेटतात? या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी दत्त यांनी 289 अंतर्गत चर्चेची मागणी केली होती. यावेळी सभापतींनी त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली. यावेळी दत्त म्हणाले की, आज चित्रपट तयार झाल्यानंतर दिग्दर्शकांना आणि अभिनेत्यांना राज ठाकरे यांना भेटावे लागते. याचा अर्थ या कलाकारांचा मुख्यमंत्री, पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या दोन वर्षात लिबरल वातावरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे ते म्हणाले. यावर सभापती यांनी शासनाला सदर प्रकरणाचे गांभीर्य असल्याचे सांगत निवेदन प्रस्तुत करण्याचे आदेश दिले.

 सुरक्षित शालेय वाहतूकीसंदर्भात लवकरच नियमावली

शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. अनिल भोसले यांनी पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याबाबत तसेच अनेक बसेस विनापरवाना सुरु असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. रावते म्हणाले की, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी 2858 विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांपैकी 1334 वाहनांची पुनर्तपासणी करण्यात आली असून 280 वाहनधारकांनी वाहने तपासणीसाठी सादर न केल्याने त्यांच्या वाहनांची नोंदणी निलंबित करण्याची कार्यवाही सुरु आहे. शालेय मुलांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात केअर टेकरची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही बसविणे, पंधरा वर्षे वापरात असलेले वाहन बंद करणे अशा अनेक तरतुदी करण्याच्या दृष्टीने शालेय सचिव आणि परिवहन सचिव यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून याबाबत निर्णय घेतले जाणार आहे. या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा

राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले. सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. देशमुख म्हणाले की, पालघर विभागाला 2.85 लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने एसटी वाहतूकीचा देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात दुध संकलन वाढले

पुणे जिल्ह्यातील सहकारी दुध व्यवसायात सन 2016मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत रुपये 29.252 लाख लिटर्स एवढे दुध संकलन करण्यात आले असून 2016 या कालावधीत दुध संकलनात वाढ झाली आहे, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात दुध उत्पादनात झालेल्या घटीबाबत सदस्य अनंत गाडगीळ यांनी प्रश्न विचारला. खोतकर पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यासह राज्यातील दुग्ध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात बल्क मिल्क कुलर उपलब्ध करुन देण्याकरिता दुग्धविकास खात्यामार्फत सर्वेक्षण मोहिम सुरु करण्यात येत आहे.

 औरंगाबाद मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी सुरु

औरंगाबाद येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. औरंगाबाद मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अमरसिंह पंडित यांनी विचारला होता. मुनगंटीवार यांनी सांगितले की, औरंगाबाद मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय ज्या विभागांशी संबंधित आहे, त्या विभागांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.