Private Advt

तीस वर्षांपूर्वीचे भाजीपाला मार्केट ‘भग्नावस्थेत’

 

चाळीसगाव। शहरातील भाजीपाला व्यापार्‍यांना एकाच जागी चांगला व्यवसाय मिळावा या उदेशाने पालिकेच्यावतीने सुमारे तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले शहरातील शनिमंदिरामागील भाजीपाला मार्केट आज पूर्णपणे ‘भग्नावस्थेत’ आहे. येथील घाणीमुळे आजुबाजुच्या रहिवाशांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे नदीपात्राचे सुशोभिकरण करण्यात येत आहे तर दुसरीकडे मात्र घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील घाणीसह डासांच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे नगरपालिका प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

चाळीसगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू, मका, ज्वारी, बाजरी या अन्नधान्यासह भाजीपाल्याचीही मनमाड, नाशिक, कन्नड येथुन मोठ्या प्रमाणात आवक होते. भाजीपाला विक्रीसाठी पूर्वी शिवाजी घाट व शनिमंदिरामागील बाजुस बाजार भरत होता. परंतु सर्व भाजीपाला व्यापारी एकाच ठिकाणी येवुन त्यांचा चांगला व्यवसाय व्हावा. तसेच ग्राहकांनाही सर्व भाजीपाला एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, यासाठी पालिकेच्यावतीने सुमारे तीस वर्षांपूर्वी याठिकाणी 96 गाळे उभारण्यात आले आहेत. याठिकाणी काही दिवस भाजीपाल्याचा लिलाव होवून वर्षभर किरकोळ भाजीपाला विक्रीची दुकानेही लागली. परंतु त्यानंतर थेट आजतागायत याठिकाणी एकही दुकान लावण्यात आले नाही. भाजीपाला बाजारात सध्या एकही भाजीपाला विक्रीचे दुकान लागत नसल्याने सध्या हे मार्केट ‘भग्नावस्थेत’ पडलेले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे व कचर्‍याचे ढिग साचले आहे. दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना डासांचा सामना करावा लागत आहे.

पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च ‘व्यर्थ’
भाजीपाला व्यवसायासाठी उभारण्यात आलेल्या व भग्नावस्थेत पडलेल्या गाळ्यांमध्ये रात्रीच्या वेळी येथे अंधार असल्याने याठिकाणी जुगार, दारू यासह अनेक अवैध धंद्यांनाही मोठ्या प्रमाणात ऊत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. याठिकाणी भाजी मार्केट आजच्या घडीला भरत नसल्याने पालिकेने केलेला लाखो रुपयांचा खर्च ‘व्यर्थ’ गेल्याचे चित्र आहे.
……………………………………………….