तीन हजारांची लाच घेतांना विरवाडे पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडले

0

प्रेमसंबंधाबाबत पोलिसात न कळविण्यासाठी लाचेची मागणी ः जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव: प्रेमसंबंधाबाबत पोलिसात माहिती कळविली तर गुन्हा दाखल होईल, अशी सबब सांगून प्रियकर तरुणाकडून 3 हजाराची लाच घेणार्‍या चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पोलीस पाटील महारु हरी कोळी वय 40 यास जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार 25 वर्षीय तरुण हा गावातीलच रहिवासी आहे. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध असून त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. सदर प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशनला कळविली तर गुन्हा दाखल होईल अशी सबब सांगून विरवाडे येथील पोलीस पाटील महारु कोळी यांनी तरुणास 3 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तरुणाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

यांच्या पथकाने केली कारवाई
तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरिक्षक निलेश लोधी, पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नासिर देशमुख यांच्या पथकाने विरवाडे शनिवारी विरवाडे गावात सापळा रचला. व तक्रारदार तरुणाकडून 3 हजार रुपये घेतांना पोलीस पाटील महारु कोळी यास रंगेहाथ अटक केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Copy