तीन वर्षांपासून फरार आरोपीस सुरतला अटक ; करवंद नाक्यावरील चोरी प्रकरण

शिरपूर। करवंद नाक्यावरील दोंडाईचा येथील तरुणाच्या खिशातील मोबाईल व रोकड हिसकाविल्याप्रकरणी तीन वर्षांपासून फरार आरोपीस सुरत येथून गोपनीय माहितीवरून ताब्यात घेतले आहे. त्याला शहर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी हजर केल्याची कामगिरी शहर पोलिसांच्या शोध पथकाने केली आहे. मुकेश सुदाम बाविस्कर (वय ३२, रा.उंटावद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे, तालुक्यातील उंटावद येथील संशयित मुकेश बाविस्कर व वरवाडेचा योगेश उर्फ महेश वसंत कोळी यांनी दोंडाईचा येथील रहिवासी दिलीपसिंग गोराखसिंग राजपूत याच्याकडून शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील छोटू कोल्हापूरी वडापाव दुकानाजवळ २९ जून २०१८ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास बळजबरीने १० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन व सहा हजार रोख रुपये बळजबरीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दोन दिवस कसून शोध घेत रचला सापळा
गुन्ह्यात वरवाडे येथील संशयित योगेश उर्फ महेश वसंत कोळी यास अटक केली होती. मुकेश सुदाम बाविस्कर हा त्या दिवसापासून फरार होता. दरम्यान, शहर पोलिसांकडून शोध घेतला जात होता. मुकेश बाविस्कर हा सतत गुंगारा देत होता. मात्र, शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने एका गोपनीय माहितीवरून सुरत शहरात दोन दिवस कसून शोध घेत सापळा रचला होता. बुधवारी सुरत येथील लिंबायत भागात सकाळी मुकेश बाविस्कर यास ताब्यात घेतले. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.लादूराम चौधरी, पोकॉ.विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार यांनी केली.

Copy