तिहेरी तलाकवर पुढील आठवड्यात सुनावणी!

0

नवी दिल्ली : बहुचर्चित तिहेरी तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे संविधानपीठ 11 मेपासून नियमित सुनावणी घेणार आहे. या सुनावणीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांची सर्वोच्च न्यायालयाने न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. मुस्लीम समुदयाच्यावतीने तीन तलाक, निकाह हलाल आणि बहुपत्नीत्वाच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता संविधानपीठच करणार आहे. उन्हाळी सुट्टीत सर्वोच्च न्यायालयातील 15 वरिष्ठ न्यायमूर्ती या याचिकांवर सुनावणी घेणार असून, अशा प्रकारची सुनावणी न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच घेतली जात आहे. एकूण तीन प्रकरणांत या न्यायमूर्तींचे संविधानपीठ आपली सुनावणी पूर्ण करणार आहेत.

पहिल्यांदाच उन्हाळी सुट्टीत संविधानपीठाचे कामकाज
सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, एस. के. कॉल यांच्या न्यायपीठाने खुर्शिद यांच्या न्यायमित्र बनण्याला परवानगी दिली. त्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यास थोडा विलंब लागला. तथापि, मुदतीनंतरही निर्णय घेतला गेला असला तरी ही बाब आपण रेकॉर्डवर घेऊ, असे न्यायपीठाच्यावतीने खुर्शिद यांना स्पष्ट करण्यात आले. वास्तविक पाहाता, उन्हाळी सुट्टीत सर्वोच्च न्यायालयाने द्वीसदस्यीय खंडपीठ काम करत असते. तर इतर खंडपीठ हे सुट्टीवर असतात. तथापि, न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच 28 पैकी 15 न्यायमूर्तींचे संविधानपीठ उन्हाळी सुट्टीत कामकाज करणार आहे. तिहेरी तलाकशी संबंधित तीनही मुद्द्यांवर 11 मेपासून हे न्यायपीठ नियमित सुनावणी घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या खटल्याच्या कामकाजाला गती देण्यासाठी सदर प्रकरण न्यायमूर्तींच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपूर्द केले होते. यावेळी न्यायालयाने मुस्लीम महिलांच्या याचिकेवर उन्हाळी सुट्टीतही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच समान नागरी कायद्याच्या वादात न पडता या प्रकरणाचा विचार करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे आव्हान
मुस्लीम समुदयाच्यावतीने ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने याप्रकरणी आव्हान दिलेले आहे. 27 मार्चरोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते, की याप्रकरणी सुनावणी घेण्याचा न्यायालयास अधिकार नाही. हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे न्यायालयाने संविधानपीठ स्थापून या प्रकरणी सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुस्लीम समाजात प्रचलित असलेल्या निकाह हलाला, तीन तलाक आणि बहुपत्नीच्या प्रथेवर प्रथमच संविधानपीठासमोर सुनावणी होत असल्याने या सुनावणीकडे देशवासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत. न्यायालयाच्यावतीने काँग्रेसनेते तथा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद हेच बाजू मांडणार आहेत. त्यांना एमिकस क्युरी (न्यायमित्र) म्हणून काम करण्यास सरन्यायाधीशांनी बुधवारी परवानगी दिली आहे.