तिसऱ्या दिवशीच दारुण पराभवाची नामुष्की

0

पुणे: न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशला मोठ्या अंतराने पाणी पाजणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा तिसऱ्याच दिवशी दणदणीत पराभव करत आसमान दाखविले. ऑस्ट्रेलियाने पुण्यातील पहिल्यावाहिल्या कसोटीत भारताचा 333 धावांनी दारुण पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ओ’केफीने दुसऱ्या डावातही जबरदस्त गोलंदाजी करताना सहा, तर लियॉनने चार गडी बाद केले. ४४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या फिरकीसमोर अक्षरशः नांगी टाकली. भारतीय संघ दुसऱ्या डावातही अवघ्या १०७ धावांत भारतीय संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर २८५ धावांपर्यंत मजल मारली. स्मिथने १०९ धावांची सुरेख खेळी केली. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर ४४१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्याही डावात भारतीय फलंदाजांनी ‘येरे माझ्या मागल्या’ करत मुश्किलीने शंभरी पार केली.

भारतीय संघ सुरुवातीलाच ढेपाळला
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 442 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावात आटोपला. विजयासाठी कोणताही प्रयत्न करता भारतीय फलंदाजांनी ओकेफीच्या फिरकीसमोर अक्षरक्ष शरणागती पत्करली. भारताकडून चेतेश्वर पूजाराने सर्वाधिक (31) धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ सुरुवातीलाच ढेपाळला. मुरली विजय आणि के. एल. राहुल स्वस्तात माघारी परतले. तर भारतीय संघाचा डाव सावरण्याचा काहीसा प्रयत्न करणारा विराट कोहलीही ‘क्लीन बोल्ड’ झाला. त्याने अवघ्या १३ धावा केल्या. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १८ धावा करून तंबूत परतला. शंभरीच्या आतच भारताचा निम्मा संघ गारद झाला होता. एका मागोमाग बसलेल्या धक्क्यांनी भारतीय संघ सावरलाच नाही आणि अवघ्या १०७ धावांत भारतीय संघाचा खेळ संपला.

कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शानदार शतक
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १४३ धावा करीत २९८ धावांची आघाडी मिळवली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. पहिल्याच सत्रात रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले. त्यापाठोपाठ आलेला मॅथ्यूही बाद झाला. दुसरीकडे कर्णधार स्टीव्ह स्मिथने मैदानावर टिच्चून फलंदाजी केली. त्याने आपले शतक साजरे केले. पुण्याच्या मैदानावरील हे पहिलेच शतक ठरले. स्मिथ मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने स्मिथला पायचीत केले. खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या कर्णधार स्मिथला रविंद्र जाडेजाने पायचीत पकडून माघारी धाडले. पण तो पर्यंत ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली होती. शनिवारी मिचेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर वाडे, स्मिथ आणि स्टार्क असे ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होत गेले आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांवर संपला. तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मिचेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. 31 धावांवर मार्शला रविंद्र जाडेजाने यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले.

ऑस्ट्रेलियन फिरकीच्या जाळ्यात अडकला संघ
आत्मघातकी फलंदाजी हे भारतीय फलंदाजांची जुनीच सवय आहे, याचा प्रत्यय पुन्हा घडला. पहिल्या डावात सलामीवीर लोकेश राहुलने केलेल्या शानदार अर्धशतकाचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळेच अवघ्या तीन तासांतच भारताचा पहिला डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याला क्षेत्ररक्षकांनी तोलामोलाची साथ दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या २६० धावांना उत्तर देताना कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची एक वेळ ३ बाद ९४ अशी चांगली स्थिती होती. मात्र उपाहारानंतर ओ’केफीने केवळ ४.१ षटकांत पाच धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत सामन्याचा रंगच पालटवला. त्यातही त्याने एकाच षटकांत तीन बळी घेत भारताला जबरदस्त धक्के दिले. भारताचे शेवटचे सात फलंदाज केवळ ११ धावांमध्ये तंबूत परतले होते. शनिवारी तिसऱ्या दिवशी याचीच पुनरावृत्ती झाली.

ओ’केफीचे प्रभावी अस्त्र आले कामी
भारताचे आघाडीचे फलंदाज मुरली विजय (2), लोकेश राहुल (10), कर्णधार विराट कोहली (13), अजिंक्य राहाणे (18) आणि रविचंद्रन अश्विन स्वस्तात बाद होऊन तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. कोहली, विजय, राहाणे आणि अश्विनला ओकेफीने बाद केले तर, लोकेश राहुलचा विकेट लिऑनने घेतला. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही ओकेफीने सहा विकेट घेऊन भारतीय फलंदाजीचा कणा मोडले. लिऑनने चार गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या दोन फिरकीपटूंनी भारताचा संपूर्ण संघ गारद केला. ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावात कर्णधार स्टीव्हन स्मिथची शतकी खेळी (109) विशेष ठरली. भारतातर्फे उमेश यादवने ४, अश्विनने ३, जाडेजाने २ तर जयंत यादवने १ बळी टिपला. तिस-या दिवसाच्या खेळात आणखी 142 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सहा फलंदाज बाद झाले.