तिने 11 विवाह करून नवर्‍यांना लुटले

0

नवी दिल्ली : एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशा प्रकरणाचा नोयडा पोलिसांनी छडा लावला आहे. यात बड्या घरची मुले हेरून त्यांच्याशी रितीरिवाजाने लग्न लाऊन नंतर त्यांच्या घरी दरोडा टाकणार्‍या तरूणीला जेरबंद करण्यात आले आहे. यात तिला तिची बहीण आणि मेहुणे हेदेखील मदत करत असल्याने त्यांनाही गजाआड करण्यात आले आहे.

लुटेरी दुल्हनची अफलातून चतुराई !

या तरूणीचे नाव मेघा भार्गव (वय 28) असे आहे. अत्यंत श्रीमंत असूनही लग्न न होणार्‍या मुलांचा शोध घेऊन त्यांना ती टार्गेट करीत असे. याखेरीज घटस्फोटीत, दिव्यांग तरुणांनीही तीने टार्गेट केले. लग्नानंतर त्यांच्यासोबत राहायची आणि योग्य संधी मिळताच त्यांचं घर साफ करून पसार व्हायची. दिसायला सुंदर असल्यानं अनेक लोक सहजच तिच्या जाळ्यात अडकायचे. या तरुणीने तब्बल 11 वेळा लग्न करून तरुणांना लाखो रुपयांना गंडविल्याचे उघडकीस आले आहे. ही तरूणी नोयडा येथे आपली बहिण प्राची भार्गव आणि भावोजी देवेंद्र शर्मा यांच्यासोबत राहात होती. केरळच्या लॉरेन जस्टिन या इसमानं ऑक्टोबरमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 15 लाखांचे दागिने घेऊन ती पसार झाल्याचं जस्टिन यानं तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीची गंभीर दखल घेत केरळ पोलिसांनी नॉएडा पोलिसांच्या मदतीनं तपास सुरू केला. अखेर दोन महिन्यांच्या तपासानंतर शनिवारी पोलिसांनी मेघा व तिच्या साथीदारांना अटक केली. जस्टिनप्रमाणेच अनेक लोकांशी लग्न केल्याची कबुली मेघानं पोलिसांकडं दिली. मात्र, आपण कुणालाही फसवलं नाही. संबंध बिघडल्यानं मी आतापर्यंतची लग्न मोडल्याचं तिनं सांगितलं.