तालुक्यात 15 गावांमध्ये जलयुक्तच्या कामांना सुरुवात

0

भुसावळ । जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसर्‍या टप्प्यातील कामांना भुसावळ तालुक्यात सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 15 गावांमध्ये नाला खोलीकरण, सिमेंट बांध, शेततळे, गाळ काढणे, समतल चर अशी कामे पूर्ण होतील. याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांना होणार असून यामुळे पावसाळ्यात पाणी जिरुन भुजल पातळीत वाढ होणार आहे. यातून परिसरातील विहीरींना नक्कीच जलपातळीत वाढ होईल.

शेती परिसरातील भूजल पातळीत वाढ होणार
यंदाचा पावसाळा वगळता गेल्या दोन वर्षांपासून भुसावळ तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. तालुक्यातील पूर्व भाग वगळता इतर सर्व भाग जिरायती क्षेत्रात मोडला जातो. या भागात भूजल पातळी वाढून सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गेल्या वर्षभरापासून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात यंदाच्या वर्षासाठी 15 गावांमध्ये कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यात गोजोरा येथे नाला खोलीकरणाचे काम सुरु आहे. आगामी पावसाळ्यात या नाल्यात पाणी साठून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कृषी विभाग आणि पंचायत समिती स्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. त्यात लोकसहभाग वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.