तारिक अन्वर यांनी पवारांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला-प्रफुल्ल पटेल

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांनी शरद पवार यांनी राफेल करारावरून केलेल्या विधानाचा आधार घेत आज राष्ट्रवादीला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तारिक अन्वर यांनी शरद पवारांच्या विधानाचे चुकीचा अर्थ काढून राजीनामा दिला आहे असे पटेल यांनी सांगितले आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, असा टोलाही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.

तारिक अन्वर यांनी पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एकदा शरद पवारांना फोन करून विचारायला हवे होते. राजीनामा देण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकसभेच्या खासदारकीचा प्रश्न अध्यक्षांच्या अखत्यारित येतो. राजीनामा पवारांकडे सोपवला असता विचार केला असता, असेही राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. बिहारमधल्या कटिहारमधून राष्ट्रवादीतर्फे तारिक अन्वर हे लोकसभेत खासदार आहेत. पवारांच्या भूमिकेवर ते काहीसे नाराज होते. गेल्या काही दिवसांपूर्वी तारिक अन्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल करारावरून टीका केली होती. राफेल करारातील घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपांवर मोदींनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.