तामिळी सुपरस्टार रजनीकांतला भेटला सवाई ‘रजनीकांत’

0

चेन्नई : तामिळी सुपरस्टार रजनीकांत हा एक चमत्कार मानला जातो. त्याची लोकप्रियता अफ़ाट आहे आणि त्याच्या बोलण्याचा जनमानसावर मोठा प्रभावही पडतो. त्याचा कुठलाही चित्रपट कोट्यवधीची उलाढालही करतो. कारण रजनीकांत म्हणजे काहीही करू शकतो आणि त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, अशीच जणू त्याच्या चहात्यांची धारणा आहे. पण अशा या सुपरमॅनलाही थक्क करून सोडणारा एक सुपर रजनीकांत भेटला आहे. त्याने आपल्या पत्नीसह कोर्टात धाव घेतली असून, रजनीचा जावई धनुष आपलाच पुत्र असल्याचा दावा या जोडप्याने केला आहे.

काथीरेशन व मीनाक्षी नावाच्या या जोडप्याने मेतनूर येथील न्यायदंडाधिकार्‍यांच्या कोर्टात धनुष आपला पुत्र असल्याचा दावा करून, त्याने आपल्याला वृद्धापकाळी पोटगी दाखल पैसे द्यावेत, असा खटला भरलेला आहे. त्या खटल्याची सुनावणी सुरू असल्याने रजनीचा जावई बेचैन झाला असून, त्याने हा खटला रद्द करण्यासाठी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाकडे धाव घेतली आहे. त्यासाठीच त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. हे कोणीतरी तोतये लोक असून आपला त्यांच्याशी कुठलाही संबंध वा नाते नसल्याचा दावा धनुषने केला आहे.

रजनीकांत आपल्या चित्रपटात कुठलेही चमत्कार व पराक्रम करत असतो. त्याला कोणी हरवू शकत नाही, की त्याच्यावर मात करू शकत नाही. म्हणूनच तो सुपरस्टार लोकांना आवडतो. पण खर्‍या आयुष्यात रजनीकांत आपल्याच वैतागलेल्या जावयाला कुठलीही मदत करू शकलेला नाही. या दांपत्याला थोपवणे वा जावयाला कोर्टाच्या कटकटीतून मुक्त करणेही त्याला शक्य झालेले नाही. मात्र हे जोडपे धनुषचा आडोसा करून थेट रजनीकांतचे व्याही व्हायला सरसावले आहे. स्थानिक लोक या निष्कांचन काथीरेशनला सवाई रजनीकांत असे मजेने म्हणू लागले आहेत.

आबा मालकर