तामिळी रहस्यकथा

0

तामीळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या अण्णाद्रमुक पक्षाची काय दुर्दशा चालली आहे? ते आपण बघत आहोत. कुठल्याही पक्षाला वा संघटनेला खंबीर नेतृत्वाची गरज असते. पण नेतृत्व इतके एकखांबी असू नये, की त्याच्या मागे संघटनेत टोकाची बेदिली माजावी. जयललिता किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांमुळे एक पक्ष उभा राहतो आणि त्याला लोकांचा पाठिंबाही मिळत असतो. पण त्यामुळे त्याला संघटना म्हणता येत नाही. संघटना ही सामूहिक नेतृत्वावर उभी राहत असते. त्यापेक्षा एकाच नेत्याच्या लोकप्रियतेवर आधारित जमलेल्या गर्दीला संघटना असे नाव दिले, म्हणून ती खरेच संघटना होत नाही. कारण त्या लोकप्रिय नेत्याच्या अनुपस्थितीत काय करावे, त्याचा निर्णय अशा संघटनेला गोतावळा करू शकत नसतो. त्यांच्यात स्वार्थ व मतभेदांची रणधुमाळी सुरू होते आणि बघता बघता पक्ष वा संघटनेचा विध्वंस होऊन जातो. अण्णाद्रमुक त्याच अवस्थेत सध्या सापडली आहे. या पक्षाची स्थापना एमजीआर या लोकप्रिय अभिनेत्याने केलेली होती. त्याच्या निधनानंतरही असेच रणकंदन माजलेले होते. पण पक्षाचा वारसा आपल्या खांद्यावर पेलू शकणारे दुसरे व्यक्तिमत्त्व, म्हणून जयललिता पुढे आल्या होत्या. त्यांच्या मागे तशी जबाबदारी पेलू शकणारा कोणीही नेता पक्षात नसल्याने अराजक माजले आहे. दंगलीचा फायदा घेऊन जशी लुटमार चालते, तसे बहुतेक नेते आपापले मतलब साधून घेण्याच्या उद्योगात गर्क आहेत. कारण त्यापैकी कोणीही खरा नेता नसून, आपापल्या परीने सत्तालंपट लोक तिथे एकत्र आलेले आहेत. त्यापैकी शशिकला तुरुंगात जाऊन पडल्या आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या पलानीस्वामी यांना पक्षासह सरकारवर मांड ठोकून काम करता आलेले नाही. पण यादरम्यान ज्या इतर घटना घडत आहेत, त्या कुठल्याही चित्रपट कथानकाला शोभणार्‍या आहेत. जयललिता यांच्याशी जवळीक करून त्यांच्या घरात घुसलेल्या शशिकला यांनी अम्माच्या निधनानंतर त्यांचा नुसता राजकीय वारसा बळकावलेला नाही. त्यांची मालमत्ताही बळकावण्याचे संपूर्ण कारस्थान आधीपासून शिजवलेले असावे.

म्हणूनच अखेरच्या कालखंडात आजारी असलेल्या अम्माला कुणाही जवळच्या नातेवाइकालाही भेटू देण्यात आले नाही. आता तर त्यांच्या ज्या अन्य मालमत्ता आहेत, तिथेही मुडदे पाडले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. जयललितांच्या अनेक मालमत्ता आहेत. करोडो रुपयांची सपत्ती त्यांच्या खाती जमा होती. त्यापैकी एका मोठ्या फार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करून अज्ञातांनी ठार मारल्याची बातमी होती. मग त्याच खुनाचा आरोप असलेला संशयितही कुठे मोटार अपघातात मारला गेल्याची बातमी आली. दुसर्‍या एका मालमत्तेच्या रक्षकावरही असाच प्राणघातक हल्ला झालेला असून अजून तो मरण पावलेला नाही. हे सर्व घडत असताना खुद्द शशिकला तुरुंगात आहेत आणि त्यांनी नेमलेला राजकीय वारसही निवडणूक आयोगाला लाच देताना पकडला गेल्याचे प्रकरण रंगलेले आहे. एका दलालामार्फत पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून दिनाकरन या शशिकलाच्या भाच्याने आयोगाच्या कुणा वरिष्ठ अधिकार्‍यालाच कोट्यवधी रुपयांची लाच देऊ केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच्याही आधी अम्माच्या रिक्त जागी होणार्‍या पोटनिवडणुकीत हाच दिनाकरन पक्षाचा उमेदवार झाला होता. त्याने मतदाराला विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे व वस्तूंचे वाटप केल्याचा गवगवा झाला. साहजिकच तिथले मतदान आयोगाला अनिश्‍चित काळासाठी रद्द करावे लागले आहे.

या सर्व गोष्टी एकाचवेळी घडत आहेत. याचा परस्पर संबंध जोडतानाही अनेक अभ्यासक पत्रकारांची तारांबळ उडाली आहे. अतिशय गुंतागुंतीची रहस्यकथा म्हणावी, असा हा घटनाक्रम आहे. शशिकला यांना एकेदिवशी अकस्मात अम्माने आपल्या घरातून हाकलून लावलेले होते. त्यांची पक्षातूनही हाकालपट्टी केलेली होती. नंतर आपल्या कुटुंबाशी सर्व संबंध तोडूनच पुन्हा शशिकला अम्माच्या निवासस्थानी दाखल झाल्या. पुढल्या काळात कुठल्याही नातलगाशी संबंध ठेवणार नसल्याचे लिहून दिल्यावरच अम्माने शशिकला यांना पुन्हा जवळ घेतले होते. पण अम्मा आजारी झाल्या व बेशुद्धावस्थेत गेल्यापासून पुन्हा शशिकला यांच्या कुटुंबीयांची वर्दळ अम्माच्या निवासस्थानी सुरू झाली. अम्माच्या आजारपणात, इस्पितळातही याच कुटुंबाच्या हाती सर्व सुत्रे होती. या कुटुंबाला मन्नारगुडी माफिया अशा नावाने ओळखले जाते. माफिया हे विशेषण कुठेही लावण्याची आपल्याकडे फॅशन आहे. म्हणूनच कोणी शशिकला यांच्या कुटुंबाची पूर्वी गंभीर दखल घेतली नव्हती. पण जयललिता यांच्या निधनानंतर ज्या घाईगर्दीने व निर्दयपणे सत्तेसह मालमता बळकावण्याचा खेळ झाला, त्यातून या माफिया शब्दाचा खरा अर्थ उलगडू लागला आहे. आमदारांना कोंडून ठेवणे वा पक्षाच्या पदाधिकारी वर्गाकडून जबरदस्तीने संमतीपत्रे गोळा करणे; अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्याच. पण आता मुडदेही पाडले जाऊ लागले आहेत. अम्माच्या मालमत्तेचे रक्षक वा जुने ड्रायव्हर यांच्याही हत्या कशासाठी होत आहेत? कष्ट उपसणार्‍यांच्या पोटभरू नोकरांच्या जीवावर कोण उठला आहे? त्याचेही कारण समजले पाहिजे. असे राखणदार वा ड्रायव्हर सतत मोठ्या लोकांच्या सहवासात व नजीक असतात. त्यांना त्या बड्या लोकांच्या गोपनीय गोष्टी ठाऊक असतात.

अनेक रहस्ये पोटात घेऊन असे कष्टकरी जगत असतात. निष्ठावान नोकर म्हणून त्यांची त्याच कारणास्तव ओळख दिली जात असते. अम्मा व शशिकला यांच्यातल्या संबंध वा नात्याविषयी त्यांनाच खूप काही ठाऊक असल्यामुळे त्यांचे जगणे कोणाला घातक वाटू लागले आहे काय? मालमत्तेचा रखवालदार वा जुना ड्रायव्हर यांना मारून कोणाला कुठली इस्टेट मिळणार आहे? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. पण त्यांच्याकडे असलेली माहिती वा त्यांचीच साक्ष, अन्य कोणा मालमत्ता बळकावण्याच्या मार्गातली अडचण असू शकते ना? तेच अशा हल्ले व हत्याकांडाचे कारण असावे. चित्रपटात वा रहस्यमय कथेमध्ये असेच किरकोळ नोकर मारले जात असलेले आपण बघतो. पण वास्तवात अशा हत्या होत असल्याचे आपल्याला बघायला मिळत नसते. या प्रकरणात संशयास्पद रीतीने अम्माच्या अनेक जुन्या निष्ठावान कर्मचारी व नोकरांची हत्या तामीळनाडूत माफियाराज असल्याची साक्ष देते आहे. मन्नारगुडी माफिया अशी शशिकलाच्या कुटुंबाची ओळख कशाला करून दिली जाते, त्याचा हा सज्जड पुरावाच मानावा लागेल. कारण खुद्द शशिकला व त्यांनी नेमलेला वारस दिनाकरन देशातील निवडणूक आयोगाला लाच देण्यापर्यंत मजल मारतो. पैसा व सत्तेच्या बळावर आपण कोणाचीही मुस्कटदाबी करू शकतो, अशी मस्ती माफिया टोळ्यांमध्येच असू शकते. त्याचीच प्रचिती सध्या तामीळनाडूच्या राजकारणात व सार्वजनिक जीवनात येत आहे. पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या दाऊद इब्राहिमची कसली दहशत, त्याच्या भारतातील टोळीवाल्या साथीदारांना असते, त्याचा हा नमुना आहे.

प्रत्येकाला जीवाची भीती आहे आणि आज सोबत असलेला सहकारी कधी बॉसच्या इशार्‍यावर आपला मुडदा पाडणार, अशी ती भीती असते. ती दहशत निर्माण करण्यासाठी आधीपासून अशा घटनाही घडवलेल्या असतात. शशिकला वा त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी आपला असा धाक निर्माण करण्यासाठी काय काय गुन्हे केलेले असतील? त्याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अशा माफिया टोळीने एका लोकप्रिय पक्षावर आणि राज्य सरकारवर आपले प्रभुत्व सिद्ध केलेले आहे. तामीळनाडू त्यातून कसा सुटणार? हे इतिहासच सांगेल.

Copy