तामिळी तिढा निर्णायक वळणावर

0

चेन्नई । तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्याततील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहचला आहे. शशिकला यांना पक्षातील बहुतांश आमदारांचा पाठींबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी अद्रमुकच्या 119 आमदारांनी आपल्या त्यांना पाठींबा असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांना पाठींबा वाढला असला तरी ते विधानसभेत शशिकला यांना आव्हान देऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असणारा कलगतुरा सोमवारीदेखील सुरूच राहिला. शशिकला यांना आज पुन्हा एकदा पन्नीरसेल्वम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना शशिकला यांनी पन्नीरसेल्वम हेे गद्दार असल्याचा आरोप केला. याचसोबत आपण जयललिता यांच्याशी एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी शशिकला हे नक्राश्रू ढाळत असल्याचा पलटवार करत त्यांच्या ताब्यात असणार्‍या आमदारांवर दबाव असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला.

अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करा

तामीळनाडुच्या राजकीय घडामोडी आता निर्णायक वळणावर येवू ठेपल्या आहेत. तामीळनाडुच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पन्नीरसेल्वम की शशिकला मुख्यमंत्रीपदी राहणार हा वाद थेट कोर्टात गेला होता. यावर आज प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव यांनी पुढच्या आठवड्यात तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्तिप्रदर्शनासोबतच पाठींब्याबाबतही मत आजमावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा निर्णय पुढच्या आठवड्यावर गेला आहे. राज्यपालांनी दोघांनीही आपले बहुमत सिद्द करण्याकरिता पुरेसा कालावधी दिला आहे.

हे तर मगरीचे अश्रू !

तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनीही शशिकलांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शशिकला यांची पत्रकारपरिषद झाल्यानंतर लगेचच पनीरसेल्वम यांनी पत्रकारपरिषद घेतली. यात ते म्हणाले की, शशिकलाचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. शशिकला सांगत असेल सर्व आमदार त्यांना हवे तिथे जायला मुक्त आहेत तर, त्यांना त्यांच्या मतदरासंघात परत पाठवा असा टोला त्यांनी मारला. ते पुढे म्हणाले की, महाबलीपूरमच्या गोल्डन बे रिसॉर्टमधील काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. एका आमदारावर चार गुंड लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी आमदारांना घेरले असून त्यांचा छळ सुरु आहे असा दावा पनीरसेल्वम यांनी केला. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात या नात्याने अधिकारांचा वापर करुन थेट रिसॉर्टमध्ये जाऊन कारवाई का करत नाही ? या प्रश्नावर त्यांनी परिस्थिती नाजूक आहे. असे पाऊल उचलले तर अजून अडचणी निर्माण होतील त्यामुळे मी संयम ठेऊन आहे असे पनीरसेल्वम म्हणाले.

पन्नीरसेल्वम किरकोळ माणूस!

जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर सोमवारी शशिकला यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यात त्यांनी जयललिता यांच्यासोबत आपल्या प्रगाढ संबंधांना उजाळा देत विरोधी गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी विचारले होते, परंतु अशा प्रसंगात आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे मी म्हटले होते. आज पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पन्नीरसेल्वम ते कधीच अम्मांप्रति निष्ठावान नव्हते हे दाखवून दिले आहे, अशी तोफही त्यांनी डागली. जयललिता यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच अण्णा द्रमुक पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता परंतु आपण तो प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या. आपण आजवर पन्नीरसेल्वम यांच्यासारखे हजारो माणसे पाहिले असून हा अत्यंत किरकोळ माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. याआधी आमदारांना बंधक बनवून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आपण कुणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध रिसोर्टमध्ये ठेवले नसल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही एका कुटुंबासारखे इथे राहत आहोत. विरोधी पक्षाकडून अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षाच्या आमदारांना बंधक बनवलेले नाही, असे शशिकला यांनी म्हटले.

119 आमदारांचं प्रतिज्ञापत्र

राज्यात राजकीय पेचप्रसंग उद्भवला असताना आज 119 आमदारांनी मद्रास हायकोर्टात शशिकला यांना आपलं समर्थन असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं. मुख्य सरकारी वकील आर. राजारत्नम यांनी हे प्रतिज्ञापत्रं कोर्टात दिलं. या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये जबरदस्ती डांबून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला होता. तो आरोपही राजारत्नम यांनी फेटाळून लावला. दरम्यान, शशिकला यांनी आपल्याला 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं मात्र प्रत्यक्षात 119 आमदारांचंच प्रतिज्ञापत्र त्यांना मिळालं आहे.