तामिळनाडूत जलिकट्टू आंदोलन पेटले

0

चेन्नई । जलिकट्टू प्रश्‍नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी तामिळनाडू राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेले आंदोलन आता हिंसक झाले आहे. राज्यातील विविध भागांत आंदोलक आणि पोलिस यांच्यात झडप झाली. त्यात शेकडो आंदोलक जखमी झाले असून, अनेकांना अटकसत्र राबविण्यात आले होते. राज्याच्या विविध भागात तीव्र आंदोलन करण्यात आले. तर काहींनी जाळपोळ, दगडफेक करून वातावरण पेटविले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. मरिना बीचवरही पोलिस व आंदोलकांत धुमश्‍चक्री उडाली. खवळलेल्या आंदोलकांना पोलिसांनी लाठीमार करून पांगवले.

मरिना बीचवर उडाली धुमश्‍चक्री
चेन्नईतील मरिना बीचवर सोमवारीही राज्यभरातून आलेल्या आंदोलकांचे आंदोलन सुरुच होते. या आंदोलनाला गालबोट लागले व आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यातच काही आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने हे आंदोलन हिंसक झाले. त्यामुळे लाठीमार करावा लागला. चेन्नईसह कोईम्बतूर, अलंगनल्लूर, थामकुम येथेही हिंसक आंदोलन झाले. चेन्नईत अनेक ठिकाणी जाळपोळ झाली असून, मरिना बीचनजीकच्या पोलिस ठाण्याला आंदोलकांनी आग लावून पेटवून दिले होते. तसेच, पोलिसांची वाहनेही पेटविण्यात आली होती. जलिकट्टू या पारंपरिक खेळाला परवानगी देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. कालच राज्य सरकारने अध्यादेश काढून खेळ सुरू केले होते. तरीही मरिना बीचवर आंदोलन सुरुच होते. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी बळाचा वापर करून आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला असता, या आंदोलकाना हिंसक वळण लागले व त्याचे लोण राज्यभर पसरले.

जमावावर पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडेही डागले व लाठीमारही केला, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. राज्य विधानसभेत सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण होणार असतानाच, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तामिळनाडूसह देशभरात चिंता व्यक्त केली जात होती. सत्तारूढ अण्णा द्रमुकसह विरोधी पक्ष द्रमुक व इतर पक्षांनीही जनभावना लक्षात घेता, जलिकट्टू खेळास परवानगी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणलेला आहे. तथापि, हे प्रकरण न्यायालयात असल्याने सरकारने सावध भूमिका घेतलेली आहे. दरवर्षी जलिकट्टू हा खेळ विनाअडथळा खेळला जावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असून, त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून जोरदार आंदोलन होत आहे. मरिना बीचवर जोरदार लाठीमार होत असल्याचा आणि ठिकठिकाणी जोरदार हिंसाचार उफळल्याचे चित्रण विविध तामिळ माध्यमांद्वारे दिवसभर दाखवले जात होते.