तहान लागल्यावर विहीर खणणार का?

0

जळगाव : जून महिन्यापासून पावसाळा सुरू होताच राज्यातील पशुधनाच्या लसीकरणाला वेग येतो परंतु, त्यासाठी आवश्यक पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांची भरती अजूनही झालेली नाही. या पदांसाठी नियोजित पूर्वपरीक्षा याआधी दोनवेळा रद्द झाली आहे. त्यामुळे तहान लागल्यावर सरकार विहीर खणणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुसंवर्धन पर्यवेक्षक व परिचर या दोन पदांसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये जाहिरात देऊन भरती काढण्यात आली होती. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकांची 149, तर परिचरची पुणे विभागात 143, नाशिक 93, मुंबई 67, औरंगाबाद 87, लातूर 22, अमरावती 69, नागपूर 99 पदे यांचा समावेश आहे. पशुधनाच्या लसीकरणात मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता असते. कारण, दुर्गम पाडे व गावांपर्यंत जाऊन काम करावे लागते. देशात पशुधनाची सर्वाधिक घनता महाराष्ट्रात आहे. त्यांच्या लसीकरणावर भर दिला जात असला, तरी त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध आहे का? असा प्रश्न या पदभरतीमुळे निर्माण झाला आहे.

या दोनही पदांसाठी लेखी परीक्षा याआधी दोनवेळा रद्द झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापूर आला तो पहिला प्रसंग होता आणि महापरीक्षा पोर्टलपासून सरकारने फारकत घेतली तेव्हा परीक्षा रद्द होण्याचा दुसरा प्रसंग होता. या दोनही वेळी उमेदवारांचे प्रवेशपत्र मात्र, तयार झालेले होते. आता ही परीक्षा केव्हा होणार याची प्रतीक्षा उमेदवारांना आहे. त्याबाबत कोणतीही घोषणा सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. ही परीक्षा तातडीने घेतल्यास अथवा थेट कागदपत्र पडताळणी करून गुणवत्ता यादी लावून त्याआधारे नियुक्ती केली गेल्यास सरकारला जून महिन्यापासूनच पशुधनाच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते, असा सूर उमेदवारांमधून उमटत आहे.

तरच वेळेत मनुष्यबळ उपलब्ध होईल

कोरोनामुळे सरकारला आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सर्वाधिक खर्च करावा लागला. खरे तर संकट आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या गरजांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पशुधन संवर्धन विभागाची गरज लक्षात घेऊन सरकारने तातडीने पद भरतीबाबत निर्णय घ्यावा, म्हणजे तहान लागल्यावर विहिर खणण्याची वेळ येणार नाही, असाही सूर उमेदवारांमध्ये आहे.

Copy