तहसीलमधून पळविलेले ट्रॅक्टर मोहाडीतील राजकीय पुढार्‍याच्या दारात

0

शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल : अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना तहसीलदारांची कारवाई

जळगाव – अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करुन हे ट्रॅक्टर दंड वसुलीसाठी तहसील कार्यालयात उभे केले होते. दरम्यान हे ट्रॅक्टर मालकाने हे ट्रॅक्टर परस्पर पळवून नेल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान हे ट्रॅक्टर तालुक्यातील मोहाडी येथील एका राजकीय पुढार्‍याच्या दारासमोर उभे असल्याची माहिती मिळाली आहे.

4 एप्रिल रोजी तहसीलदारांनी केली होती कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरबाबबत तहसीलदार वैशाली हिंग यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह 4 एप्रिल रोजी मोहाडी येथे जावून संबधित ट्रॅक्टर जप्त केले होते. चालक रुपचंद गुलचंद साळुंखे वय 33 रा. मोहाडी याच्या ताब्यातील हे ट्रॅक्टर (क्र. एम.एच-19 सी 3277) हे पुढील दंडवसुलीच्या कारवाईसाठी तहसील कार्यालयात उभे केले होते. चौकशीत सतिष संजय उर्फ ईश्‍वर कोळी (सोनवणे) रा. मोहाडी हे ट्रॅक्टरचे मालक असल्याचे समोर आले होते.

मालकाने पळविले ट्रॅक्टर

7 एप्रिलपर्यंत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे होते. 8 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तहसिलदार वैशाली हिंगे या कार्यालयात आल्या असता ट्रॅक्टर हे जागेवर दिसले नाही. तसेच गेटचे कुलूपही उघडे दिसले. त्यांनी कर्मचार्‍यांना विचारपूस तसेच चौकशी केली व इतरत्र शोध घेतला असता वाळूसहीत ट्रॅक्टर मालक सतिष कोळी यांनी परस्पर पळवून नेल्याचे निष्पन्न झाले होते. पळवून नेल्याची खात्री झाल्यावर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या आदेशानुसार पिंप्राळा येथील मंडळाधिकारी रविंद्र उगले यांच्या फिर्यादीवरुन 2 लाख 50 हजार रुपयाचे ट्रॅक्टर व 1 ब्रॉस 3 हजार 492 रुपयांची वाळू असा एकूण 2 लाख 53 हजार 492 रुपयांचा ऐवज लांब विल्याप्रकरणी नेल्याप्रकरणी शहर पोलिसात ट्रॅक्टर मालक सतिष कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दंड न भरता कार्यालयाचे कुलूप तोडून वाळूने भरलेले ट्रॅक्टर मालक सतिष कोळी पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बड्या राजकीय पुढार्‍याच्या दारात उभे ट्रॅक्टर

सदरचे पळवून नेलेले ट्रॅक्टर हे मोहाडी येथील एका बड्या राजकीय पुढार्‍याच्या दारासमोर उभे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायात राजकीय भागीदारी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. दरम्यान तहसील कार्यालयातून पळवून नेलेले तसेच गुन्हा दाखल असलेले हे ट्रॅक्टर मोहाडीत उभे असतांना याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे? हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Copy