तस्करी करून आणलेल्या 19 परदेशी पक्ष्यांची सुटका

0

वडगाव शेरीत बंगल्यावर टाकला छापा

पुणे : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) विशेष पथकाने वडगाव शेरी भागात असलेल्या एका बंगल्यावर छापा टाकून 19 परदेशी पक्ष्यांची सुटका केली. या कारवाईत फिलिपिन्स, इंडोनेशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील विविध प्रजातींच्या पक्ष्यांची सुटका करण्यात आली. डीआरआयच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले पक्षी पुढील संगोपनासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

वडगाव शेरी भागातील रहिवासी डोमॅनिक सिक्वेरा यांच्या बंगल्यात परदेशातून तस्करी करून आणलेले पक्षी ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयच्या पुणे विभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सोमवारी सिक्वेरा यांच्या बंगल्यात छापा टाकला. त्यांच्या निवासस्थानातून आफ्रिका खंडात आढळणारे 15 लव्हबर्ड, दक्षिण अमेरिका, फिलिपिन्स तसेच इंडोनियाशात आढळणार्‍या पक्ष्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती पुणे विभागातील अधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणी सिक्वेरा यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव कायदा आणि भारतीय सीमा शुल्क कायद्याअंतर्गत (कस्टम) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशातून तस्करी करून आणलेले अनेक शोभिवंत पक्षी अनेक जण हौसेने पाळतात. तस्करी करून आणलेले शोभिवंत पक्षी पाळणे गुन्हा आहे. सिक्वेरा यांच्या बंगल्यातून सुटका करण्यात आलेले 19 पक्षी संगोपनासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात संगोपनासाठी सोपविण्यात आले आहेत.

Copy