तळोद्यातील चोरी प्रकरणी तीन चोरटे जेरबंद: एलसीबीची कामगिरी

0

तळोदा:शहरातील चिनोदा रस्त्यावरील एकाच रात्रीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सात दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. यात फक्त आदर्श ऑटो पार्ट्स या एका गॅरेजच्या दुकानामधून 6 हजार 300 रुपयांचा स्पेअर पार्टचा सामान चोरट्यानी लंपास केला होता. या चोरट्यांना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी 3 आरोपींना तळोदा येथून व एका आरोपीला गडीकोठडा, ता.तळोदा येथील त्याच्या राहत्या घरून अशा 3 चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर असलेले आदर्श ऑटो गॅरेजचे पत्र्याचे शेडचे कुलूप तोडून यामधून 6 हजार 300 रुपयांचे स्पेअर पार्टचा सामान चोरट्यांनी चोरून नेला होता. त्याचा तपास नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला होता. यावेळी तपास सुरू असतांना महाराष्ट्र बँक येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये दिसणारे इसम पाहता त्यामधील एक इसम हा तळोदा पोलीस ठाणे येथील रेकोर्डवरील गुन्हेगार असल्याचे आढळून आले. त्याने यापूर्वीही मोटर सायकलची चोरी केलेली आहे. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या तीन इसमांपैकी दोन इसम तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत मिळालेल्या गोपनिय माहितीची खात्री करून ते तळोदा येथील चिनोदा रस्त्यावर एका चहाच्या टपरीजवळ दोन इसम होंडा शाईन मोटर सायकलजवळ उभे असलेले दिसून आले. यावेळी त्यातील एक हा पुण्या तारक्या वसावे (वय 25) आणि सुनील खारक्या पाडवी (वय 20, दोन्ही रा.लक्कड़कोट, ता.तळोदा) या दोघांना त्या ठिकाणी तात्काळ अटक करून त्यांना तळोदा पोलीस स्टेशनला नेऊन विचारपूस केली. तेव्हा त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिसरा आरोपी सुनील परता वसावे (वय 19, रा.गडीकोठडा) येथून याला घरीच अटक करण्यात आली. त्यानंतर या तिन्ही आरोपींना तळोदा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यावर तिन्ही आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक योगेश राऊत, अनिल गोसावी, दीपक गोरे, योगेश सोनवणे, मुकेश तावड़े, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, मनोज नाईक, विकास अजगे, मोहन ढमढेरे, सतीश घुले यांच्या पथकाने केली.

Copy