तळेगावात भर दिवसा घर फोडले 

0
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे मधील वतन नगर येथील एका वसाहतीमधील घर अज्ञात चोरटयांनी भर दिवसा फोडले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. अज्ञात चोरटयांनी 40 हजार 500 रुपये किमतीचे सोने, घड्याळ असा ऐवज चोरून नेला. अंजली अतुल मेहंदळे (वय 47, रा. तळेगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली तळेगाव येथे व्यवसाय करतात. मंगळवारी व्यवसायानिमित्त त्या सकाळी अकराच्या सुमारास घराबाहेर गेल्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले 20 हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे मणी मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे कानातील टॉप्स आणि 500 रुपये किमतीचे मनगटी घड्याळ असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन चोर पसार झाला. अंजली दुपारी अडीचच्या सुमरास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
Copy