तळवेलच्या युवकाची नैराश्यातून आत्महत्या

वरणगाव : तळवेल गावातील संजय नगर भागातील रहिवासी असलेल्या जितेंद्र दत्तू देवरे (30) या तरुणाने नैराश्येतून गळफास घेत आत्महत्या केली. बुधवार, 22 सप्टेंबर रोजी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
जितेंद्र देवरे (सोयगाव, ह.मु.तळवेल) येथे मामाच्या गावी रोजगारासाठी सोयगाव, ता.सिल्लोड येथून कुटुंबासह आले होते. देवरे यांच्या पत्नी व मुले माहेरी पंधरा दिवसांपूर्वीच गेल्याने तरुण व त्याची आई घरी वास्तव्यास होते. बुधवारी घरी कुणी नसताना जितेंद्रने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी युवकाने चिठ्ठी लिहिली असून त्यात पत्नी, मुले व आईला सुख देवू शकलो नाही तसेच व्यसन जडल्याने व त्यात काम नसल्याने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. या प्रकरणी योगेश्वर अनिल गावंडे (25, मनुदेवी नगर) यांनी खबर दिल्यावरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत. मृत जितेंद्र यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई असा परीवार आहे.

Copy