तळवेलच्या तिघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

नवीन महामार्ग उड्डान पुलावर अपघात : तळवेलच्या तिघा मित्रांचा मृत्यू

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार
तळवेलचे तिघे मित्र भुसावळ येथे काही कामासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात ते गावाकडे दुचाकी (एम.एच.19 यु.7863) ने येत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला जबर धडक दिल्याने विवेक सुनील पाटील (16) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर श्याम राजेंद्र पाटील (16) व देवानंद सोपान पाटील (17) या अत्यवस्थ अवस्थेत गोदावारी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाही त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघातप्रकरणी अनिल प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील, मुकेश जाधव, नागेंद्र तायडे, होमगार्ड महेश पाटील करीत आहेत.

मयत तिघे विद्यार्थी
अपघातात ठार झालेला विवेक हा मुक्ताईनगर आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता तर देवानंद हा तळवेलच्या नेहरू विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी होता तसेच तुषारदेखील दहावीचा विद्यार्थी होता. मयत विवेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हेंडवे यांनी तर देवेंद्र पाटील व शाम पाटील या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जळगाव सामान्य रुग्णालयात करण्यात आले.