Private Advt

तलाठ्यास धक्काबुक्की करून वाळूचे डंपर पळविले

जळगाव : दादावाडी परीसरातील आर.एल.हॉस्पिटलसमोरून जवळ अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे डंपर पकडल्यानंतर तलाठीला धक्काबुक्की करून डंपर पळवून नेण्यात आले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात डंपर चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
शहरातील दादावाडी परीसरातील आर.एल.हॉस्पिटलसमोरून शनिवार, 12 मार्च रोजी बेकायदेशीररीत्या डंपरद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार तलाठी राजू बर्‍हाटे यांनी शनिवार, 12 मार्च रोजी रात्री 11 वाजता धडक कारवाई करत अवैध वाळूने भरलेले डंपर (एम.एच.19 सी.वाय.4414) पकडले. डंपर चालकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर डंपर मालक आनंद इंगळे व डंपर चालक सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांनी तलाठी यांना धक्काबुक्की देऊन डंपर घेत पळ काढला. तलाठी यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर रविवार, 13 मार्च रोजी सकाळी डंपर चालक सागर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि मालक आनंद इंगळे (रा.आव्हाणे, ता.जळगाव) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.