…तर हेल्मेटसक्तीची गरज भासणार नाही

0

गिरीश बापट : पोलीस आयुक्त आणि आरटीओशी करणार चर्चा

पुणे : हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि महामार्ग परिसरात कायद्याची अंमलबजावणी करावी. एकदा का नागरिकांना या कायद्यांची सवय झाली की, त्यानंतर त्यांना कुठल्याही सक्तीची गरज भासणार नाही, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी हेल्मेटसक्तीच्या विरोधात असलेल्या पुणेकरांची पाठराखण केली. यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त आणि आरटीओशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.

दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट किंवा भरधाव वेगात वाहने चालवणे यासारख्या घटना रोखण्यासाठी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेटसक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी गिरीश बापट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, विवेक वेलणकर, सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते.

..तर आंदोलन आणखी तीव्र करू : पाठक

ज्या-ज्या वेळी हेल्मेटसक्ती झाली, त्यावेळी गिरीश बापट त्या विरोधात होते. हेल्मेटसक्ती विरोधातील आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. त्यामुळे पुणेकरांचा नेमका काय प्रश्‍न आहे, तो त्यांना समजला आहे. पण, इतके होऊनही जर कोणी आमच्यावर सक्ती लादत असेल, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असे हेल्मेट कृती समितीचे सूर्यकांत पाठक यांनी यावेळी सांगितले.

प्रबोधन करण्याची गरज

पुणेकरांना हेल्मेट घालण्याची सवय नाही. पण दिल्ली, बंगळुरू, कोलकाता या मोठ्या शहरात खूप वर्षांपूर्वी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी झाल्यामुळे लोकांना त्यात वेगळे काही वाटत नाही, जे पुणेकरांना वाटते. त्यामुळे सक्ती करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे. हेल्मेटसक्ती संदर्भात न्यायालयाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे, त्याविरोधात आपण जाऊ शकत नाही. मात्र, महामार्गावर अपघातांमध्ये अनेक नागरिक जखमी होतात. डोक्याला इजा होऊन मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही मोठी आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यावर सर्व बाजूंनी उपाययोजना केली पाहिजे, असे बापट यांनी यावेळी सांगितले.

Copy