तर भुसावळ ऑर्डनन्सचे सांडपाणी रोखणार

शिवसेना पदाधिकार्‍यांचे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन

भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही पद्धत्तीने कंडारीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असून या संदर्भात शुक्रवारी प्रांताधिकारी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली तसेच निवेदनाची प्रत संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे. पदाधिकार्‍यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यास भुसावळ फॅक्टरीतर्फे उत्सर्जित झालेले सांडपाणी, घाण कचरा हा कंडारीकडे जात असल्याने तो प्रसंगी रोखण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

चर्चेसाठीही देण्यात आली नाही वेळ
निवेदनाचा आशय असा की, गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ ऑर्डनन्सच्या जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही पद्धत्तीने कंडारीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी जनरल मॅनेजर यांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितली मात्र या सर्वांनाच भेटीची वेळ देण्यात आलेली नाही तसेच फोनवर चर्चा करण्यासाठीसुद्धा तयारी दर्शवण्यात आली नाही, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

पाच हजार नागरीकांची गैरसोय
रस्ता बंद करण्यात आल्याने ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी तसेच कंडारी परीसरातील महिला, ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी अश्या पाच हजार नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने सर्वसामान्यांना पेट्रोलवर जास्त खर्च करावा लागत आहे. यास संदर्भात शुक्रवारी भुसावळ उपविभागीय कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिक्षक सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवा सेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर केले. भुसावळ फॅक्टरीतर्फे उत्सर्जित झालेले सांडपाणी, घाण कचरा हा कंडारीकडे जात असल्याने ते बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

संरक्षणमंत्र्यांकडे तक्रार दाखल
जनरल मॅनेजर परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक मराठी माणसाच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही. एका प्रकारची हिटलरशाही फॅक्टरी परीसरात सुरू आहे म्हणून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात असल्याचे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.