…तर भुसावळातील जनता तुम्हाला माफ करणार नाही

0

भुसावळ : शहरात अशुद्ध पाणीपुरवठा सातत्याने सुरू असल्याने भुसावळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रार करूनही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन दखल घेत नसल्याने भुसावळकर संतप्त झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठ्याचा त्रास शहरवासी सहन करीत आहेत तर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरीकांना साथीचे आजार जडण्याची भीती असून काही भागात नागरीकांना त्याचा परीणाम जाणवत असल्याचे जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी म्हटले आहे. भुसावळकरांना शुद्ध पाणी न मिळाल्यास जनता तुम्हाला माफ करणार नाही व आगामी निवडणुकीत त्याचे परीणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशाराही रहिम कुरेशी यांनी दिला आहे.

विरोधी नगरसेवकांनी केली नगराध्यक्षांना अपात्र करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उल्हास पगारे यांनी शहरातील दूषित पाणीपुरवठ्याचा ठपका नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यावर ठेवत त्यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या कुठल्याही प्रश्‍नांबाबत नगराध्यक्ष गंभीर नसून दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भीती नगरसेवक पगारे यांनी मुख्याधिकार्‍यांना 18 रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे. शहराला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षाही त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर व राहुल बारसे यांनी केली आहे.

आवर्तनाची मागणी यापूर्वीच केली : नगराध्यक्ष
पालिकेच्या बंधार्‍याने तळ गाठला असून शेवाळदेखील वाढले आहे. जलशुद्धीकरण प्रक्रियेत ठरावीक पद्धत्तीनेच क्लोरीन वापरता येते व अधिक क्लोरीन वापरल्यास त्याचा परीणाम नागरीकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे. यापूर्वीच आवर्तनाची मागणी 13 मे रोजी करण्यात आली असून हतनूरचे आवर्तन सुटल्यानंतर व बंधार्‍यात पाणी पोहोचल्यानंतर प्रश्‍न सुटणार असल्याचे नरगाध्यक्ष रमण भोळे यांनी सांगत पाणी उकळून व गाळूनच प्यावे, असेही म्हणाले. विरोधकांचे कामच आरोप करणे असल्याचेही त्यांनी सांगितले.

हतनूरच्या आवर्तनानंतर सुटणार समस्या
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍यांची पातळी कमी झाल्याने तसेच अनेक दिवसांपासून पाणी साठल्याने व प्रखर उन्हामुळे पाण्यात शेवाळ निर्माण झाले आहे. पालिकेकडून प्री क्लोरीनेशनची प्रक्रिया करून तसेच अ‍ॅलम वापरून पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतरही पाण्याला पिवळसर रंग प्राप्त होत असून शेवाळचा दुर्गंध त्यात येत आहे, असे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये कळवले आहे. 13 मे रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे आवर्तनाची मागणी करण्यात आली असून आवर्तन सुटल्यानंतर व बंधार्‍यात पाणी पोहोचल्यानंतर समस्या सुटणार असल्याचेही मुख्याधिकारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

Copy