तर उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा : खासदार संजय राऊत

मुंबई : हनुमान चालिसा लावण्यावरून मुंबईत झालेल्या गोंधळानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय गृह सचिवांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहेत. ते म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लावावयाची झाल्यास महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशातदेखील लावावी.

उत्तर प्रदेशाविषयी कुणीही बोलत नाही
खासदार राऊत म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही प्रश्न असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे. गेल्या तीन महिन्यात 17 बलात्कार उत्तर प्रदेशात झाले आहेत, त्यासंबंधी कोणी गृहमंत्र्यांना माहिती देत असेल चांगलेच आहे ना ! राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्र लावण्यात यावी तसेच आतापर्यंत गेल्या दोन वर्षात भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत सात वेळा केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले आहेत. भाजपकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र सुरू आहे. ही सगळी ढोंगे सुरु आहेत, हे दोन चार लोक दिल्लीला जातात, पत्रकारांना भेटून महाराष्ट्राची बदनामी करतात, असेच सुरु राहिले तर किरीट सोमय्यांसारख्या महाराष्ट्रद्रोही लोकांना लोक चपला मारतीलच अशी टीकाही सोमय्या यांच्या दिल्ली दौर्‍यावर खासदार राऊत यांनी केली.