तरुण-तरुणीने एकमेकांना भोसकले, हत्या की आत्महत्या?

0

दिघी : विवाहित असलेला तरूण व तरुणीने एका बंद खोलीत एकमेकांवर धारदार चाकूने वार करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिघीतील आदर्शनगरात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या दोघांनी एकमेकांवर चाकूने वार करत आत्महत्या केली किंवा त्यांची कोणीतरी अज्ञाताने हत्या केली, याविषयी स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रेमप्रकरणातून दोघांनी एकमेकांवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सपना सुरेश बले (वय 25, रा. आदर्शनगर, दिघी. मूळ रा. हडसर, जुन्नर) व पद्माकर साबळे (वय 24, रा. हडसर, जुन्नर) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेत सपना व पद्माकर हे चाकूने वार झाल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. दोघेही विवाहित होते. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेमुळे दिघी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोघांचे बंद खोलीत भांडण
प्राप्त माहितीनुसार, दिघी येथील आदर्शनगर भागात ही घटना घडली. बंद असलेल्या खोलीत शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सपना व पद्माकर यांच्यात भांडण सुरू होते. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूला राहणारे रहिवासी खोलीजवळ जमा झाले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने रहिवाशांनी दरवाजा तोडला असता, सपना व पद्माकर दोघेही जखमी अवस्थेत पडलेले होते. त्या दोघांवर घरातील चाकूने वार झालेले होते. या घटनेविषयी स्थानिक रहिवाशांनी तत्काळ दिघी पोलिसांना माहिती दिली.

दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या सपना व पद्माकर यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. सपना व पद्माकर हे दोघेही हडसर (जुन्नर) या एकाच गावाचे रहिवासी आहेत. लहानपणापासून ते एकमेकांना ओळखत होते. खोलीत भांडण झाल्याने दोघांनी एकमेकांवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.

प्रथमदर्शनी हे प्रेमप्रकरण दिसून येत आहे. कारण दोघेही एकाच गावाचे रहिवासी आहेत. त्यांची लहानपणापासून ओळख होती, असेही समोर येत आहे. त्यानुसार, खोलीत त्यांची भांडणे झाली असावीत व त्यातून त्यांनी एकमेकांवर वार केले असावेत किंवा स्वतःला त्यांनी मारून घेतले असावे. ही हत्या आहे की, आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. ते आता शवविच्छेदनानंतरच कळेल.
नवनाथ घोगरे, पोलिस निरीक्षक, दिघी पोलिस ठाणे.