तरुणाला लुटणार्‍या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश

0

जळगाव – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथुन जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमधील अज्ञात चार जणांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवुन बेदम मारहाण करत लुटल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता जळगाव जामनेर रोडवरील रेमंड चौफुलीजवळ घडली . या गुन्ह्याचा अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वसीम खान अजमल खान वय 28 व सलीम खान उर्फ गुड्डू ईब्राहीम खान वय 33 रा. दोघे रा. नशिराबाद, ह.मु. शिवनेरी नगर कोंडवा पुणे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात कार तसेच लुटलेली रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांवर यापूर्वी खून, चोरीचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.

काय घडली होती घटना
दिपक रतिलाल माळी (वय-28) रा. पाधळी ता. धरणगाव हे एक रिक्षा चालक आहे. जळगाव शहर ते पाळधी दरम्यान रिक्षा चालवतात. आज बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास (एमएच 18 डब्ल्यू 4588) क्रमांकाच्या रिक्षाने खासगी कामाच्या निमित्ताने जामनेर जाण्यासाठी शहरातील अजिंठा चौफुलीवर आले. रिक्षा लावल्यानंतर जामनेर जाण्यासाठी रोडवर उभे होते. त्यावेळी एक कार आली त्यातील चालकाजवळ बसलेल्या व्यक्तिने जामनेर जायचे आहे का असे विचारले, त्यावर दिपक याने होकार दिला व तो कारमध्ये बसले, पुढे रेमंड चौकात कार थांबवून कारच्या बाजूला बसलेले अज्ञात व्यक्तींनी दिपकला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या खिश्यातील 1 हजार 250 रूपये बळजबरीने हिसकावून घेतले व त्यास जीठे ठार मारण्याची धमकी देवुन कारमधुन खाली उतरवून दिले व चौघांनी पोबारा केला.यानंतर दिपकने एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. किरकोळ रक्कम असतानाही भविष्यात अशा प्रकारचा गंभीर गुन्हा पुन्हा घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी तत्काळ तक्रारीची गंभीर दखल घेऊन भादंवि कलम 394 नुसार कार चालकासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.