तरुणाचा अपघाती मृत्यू : वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

मयत तरुण भुसावळातील मोतीराम नगरातील रहिवासी : दुचाकीवरून परताना माळी भवनाजवळ अज्ञात वाहनाने दिली धडक

भुसावळ : वरणगावकडून भुसावळकडे येणार्‍या 25 वर्षीय दुचाकी चालकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना 22 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील माळी भवन, रॉयल ढाब्याजवळ घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार नामदेव जंजाळकर (25, मोतीरामनगर, भुसावळ) हे दुचाकीने शहराकडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देवून पळ काढला होता. पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मा तपासात हा अपघात असल्याचे निष्पन्न झाल्याने हवालदार सुनील बारकू जोशी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.

 

Copy