तरवाडे येथून साडेचार लाखांचे डांबर चोरीला

चाळीसगाव- जीवन चव्हाण :  डांबरच्या भरलेल्या टँकर मधून नऊ टन डांबर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तरवाडे येथील परिसरात घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विजय चंद्रमा आशण्णा (वय- ३५ रा. काजीवाडा औरंगाबाद ) याचे मालकीचे तालुक्यातील तरवाडे येथील गट क्र. २६३ येथून अज्ञात इसमाने भरलेल्या टँकरमधील ९ टन डांबर दि. ६ ते ७ एप्रिल दरम्यान चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण ४,५०,००० लाख रुपये किंमतीचे डांबर चोरीला गेल्याने विजय चंद्रमा आशण्णा यांच्यावर डोंगरच कोसळला आहे. हि घटना उघडकीस येताच विजय चंद्रमा आशण्णा यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज सायंकाळी अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.