Private Advt

तरवाडेपेठच्या पाववडे विक्रेत्याला चौघांकडून मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : तालुक्यातील तरवाडे पेठ येथील पाववडे विक्रेत्यास लोखंडी झारा आणि सळईने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील रहिवासी सोपान निंबा पावले (25) हे पाववडा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता गावातील साईबाबा मंदिराच्या गेटसमोरील ठिकाणी ते पाववडा विक्री करीत असताना गावातील राजेंद्र एकनाथ गढरी, डिगंबर एकनाथ गढरी, कृष्णा डिगंबर गढरी आणि एकनाथ काशिनाथ गढरी यांनी पाववडा घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांसह सोपान पावले यांना शिविगाळ केली. व पावले यांना लोखंडी सळईसह लोखंडी झारा डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा.निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.