डोल्हारीवासीयांनी दिली लग्नातील अनिष्ट रुढींना तिलांजली

0

ओमकार पोटे /विक्रमगड। आदिवासी समाज्याचे लग्न म्हटले की, वधूवर पक्षाच्या कुटुंबीयाचे कंबरडेच मोडते. म्हणूनच शंभर टक्के आदिवासी समाज असलेल्या डोल्हारी गावाने गाव मेळाव्यात लग्न समारंभात दारू, ताडी, कपड्याचे- भांड्याचे मान-पान, अनिष्ट-रुढी परंपरांना बंदी घालण्याचा ठराव केला असून, या पुढे डोल्हारी गावातील गाव-पाड्यावर लग्न समारंभात दारू, ताडी, मान-पान याच्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा ठराव सर्व गाव समितीने झालेल्या गाव मेळाव्यात करण्यात आला आहे.

अतोनात खर्चाने नेक आदिवासी कुटुंब कर्जाच्या विळख्यात

हळदी-कुंकु, वधूवराला पाहायला जाणे, मांडव समारंभ, लग्न, असा 2-3 दिवसांचा कार्यक्रम असतो. लग्न समारंभ म्हटले की, खाणार्‍या-पिणार्‍यांची चांगलीच चंगळ असते. मांसाहाराचा बेत घरातली लग्न पूर्णच होत नाही. याशिवाय तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी विशेष सोय केली केली जाते यात दारू, ताडी ती वेगळीच. दारू, ताडी या नशीला गोष्टीमुळे लग्नात वादविवाद, भांडणे या मुले मंगल प्रसंगी विघ्न तयार होतात त्यात लग्न कार्यात येणार्‍या नातेवाइकांना कपडे, भांडी याचे मान-पान त्यात लग्नकार्य करता करता अनेक आदिवासी कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडली आहेत. डोल्हारी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतचा गाव मेळावा संपन्न झाला. या वेळी गावातील पारंपरिक सांस्कृतिक रुढींना उजाळा देण्यात आला. या वेळी गावातील नागरिकांनी तारपा नृत्य, तूर नाच, ढोल नाच, तांबडनाच, याचे सादरीकरण करण्यात आले तसेच या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय नोकरीत लागलेल्या युवक-युवतीचा सत्कार करण्यात आला. तसेच गावाचा एकोपा व्हावा म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या वेळीच आदिवासी समाज का मागे पडला आहे. याचे चिंतन करण्यात आले. दारू, ताडी, मटणाच्या प्रथेमुळे अनेक ठिकाणी हाणामारी झाल्याने मंगलप्रसंगी विघ्न निर्माण होते. ही प्रथा बंद करून साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न करून तरुणांनी आदर्श घालून द्यावा, असे या वेळी ठरले. यामुळे सामाजिक विकास घडून समाज सुधारण्यास मदत होईल. अशाप्रकारची भूमिका घेण्यात आल्याने आदिवासी बांधवाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

अनावश्यक उधळण थांबवली

आमचा गावातील लग्न समारंभात अनिष्ट चाली, रुढींना फाटा देण्याचा निर्णय व ठराव आम्ही आमचा गाव मेळाव्यात एकमुखाने घेतला. विशेषतः साखरपुडा व लग्न समारंभातील अनावश्यक होणारी उधळण, दारू, ताडी, साड्या मान-पान देण्याची प्रथा व लग्नाच्या या प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-किरण गहला, ( ग्रामस्थ, डोल्हारी बुद्रुक)

आधुनिकतेकडे जाण्यास सज्ज

आमचा आदिवासी समाजात लग्न हे शुभ कार्यक्रम समजला जातो. लग्नाचा अवास्तव खर्चामुळे अनेक आदिवासी कुटुंबे कर्जाच्या खाईत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील पिढीचा शिक्षणावर होतो. मात्र, गावागावांतील तरुणांनी याची दखल घेऊन ही दारू, ताडी व इतर खर्चीक प्रथा बंद करावी, असा आमचा प्रयत्न. त्यातून पहिल्यांदा आम्ही आमच्या गावापासून सुरुवात करून आमचा आदिवासी समाज पारंपरिक संस्कृतीबरोबरच नवीन बदल करत आधुनिकतेकडे जाण्यासाठी सज्ज झालो आहोत.
– राजा गहला, (ज्येष्ठ ग्रामस्थ, डोल्हारी )