Private Advt

डोलारखेडा-वढोदा रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण

मुक्ताईनगर : वढोदा ते डोलारखेडा रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात नित्यांचे झाले असून मोठा अपघात होण्यापूर्वी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा आहे. वढोदा ते डोलारखेडा या 31 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नेहमीच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते मात्र खराब रस्त्यामुळे किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहन नेमके चालवावे कसे? असा प्रश्‍न वाहनधारक उपस्थित करीत आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ? अशी पक्षहस्थिती निर्माण झाली असून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा वाहन धारकांकडून व्यक्त होत आहे.

अपघातापूर्वीच घ्यावी दखल
महालखेडा येथील वळणावर दोन भले मोठे खड्डे पडले असून एक खड्ड्यातील भराव वाहिल्याने छोट्या चारचाकी कारच्या इंजिनाला या खड्ड्यातून गेल्यानंतर फटका बसल्याचे प्रकार घडत आहे. वर्षभरापासून या रस्त्याची अवस्था बकाल झाली असून लोकप्रतिनिधींचे या रस्त्यावरून येणे-जाणे असतानाही दखल घेतली जात नसल्याने आश्‍चर्यवजा संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम किंवा दुरुस्ती होणार तरी कधी ? असा प्रश्न या परीरसरातील वाहनधारकांना पडला आहे.