डोमेन, नाओमी यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटूचा पुरस्कार

0

चंडीगड : बेल्जियमचा कर्णधार आणि आॅलिम्पिक पदकविजेता जॉन डोमेन तसेच नेदरलँड्स संघाची नाओमी वॉन एस यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने २०१६ चे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले. हॉकीच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या सोहळ्यात सर्वोत्कृट खेळाडू, गोलकीपर, प्रतिभावान खेळाडू, कोचेस आणि पंचांचा गौरव करण्यात आला. भारताचा कर्णधार आणि गोलकीपर पी. आर. श्रीजेश हा गोलकीपरच्या तसेच हरमनप्रीतसिंग हा प्रतिभावान खेळाडूच्या शर्यतीत होता; पण दोघांनाही पुरस्कार जिंकण्यात अपयश आले.

सर्वोत्कृष्ट पंच ख्रिस्टियन
ब्रिटनची मॅडी हिच हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. पुरुष गटात हा पुरस्कार आयर्लंडचा डेव्हिड हर्टे याने पटकविला. बेल्जियमचा आर्थर वॉन डोरेन याला सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महिला गटात हा पुरस्कार अर्जेंटिनाची मारिया ग्रानाटो हिने जिंकला. सर्वोत्कृष्ट कोचचे दोन्ही गटांतील पुरस्कार ब्रिटन संघाला मिळाले. डॅनी केरी आणि कारेन ब्राऊन यांना हे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट पुरुष पंच जर्मनीचे ख्रिस्टियन ब्लाश हे तर महिला पंच म्हणून बेल्जियमच्या लॉरिन डेन फोर्ज पुरस्काराचे मानकरी ठरले.

दर्जा मिळण्यासाठी पुरस्कार महत्वाचे
यावेळी एफआयएच अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले, जागतिक स्तरावर नैपुण्यप्राप्त पुरस्कारविजेत्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळत राहील. अशा पुरस्कारामुळे खेळाडूंना अधिक प्रेरणा मिळत असते. यामुळे निश्चितच खेळाचा देखील विकास होतो. जागतिक स्तरावर खेळाला दर्जा मिळण्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा असल्याचे बत्रा यांनी सांगितले. खेळातून प्रेरणा घेऊन खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.