डोंबारी खेळ करणार्‍या शांताबाईंचा पुरस्काराने गौरव

0

पुणे शहर व्यापारी असोसिएशनतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 

पुणे : खांद्यावर आणि हातामध्ये लहान मुले घेत काचेच्या बाटलीवर तोल सांभाळण्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत डोंबारी खेळ करणार्‍या 85 वर्षांच्या शांताबाईंनी प्रेक्षकांना थक्क केले. पोटाची खळगी भरण्याकरीता डोंबारी खेळ करीत आपल्यासोबत 10 अनाथ मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सांभाळण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे शहर व्यापारी असोसिएशनने त्यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासोबतच आर्थिक मदत दिली आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात पुणे शहर व्यापारी असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात शांताबाई पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन, कुसुम जैन, सिद्धार्थ जैन उपस्थित होते. कार्यक्रमात मंडप उभारणी करणारे सदाशिव सूर्यवंशी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, साडी, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. शांताबाईंसह त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी डोंबारी खेळ करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

अ‍ॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, डोंबारी खेळ करणार्‍या शांताबाईंनी पैशाची अडचण असताना स्वत: सोबत अनाथ मुले दत्त घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे काम केले आहे. आपल्याकडे सर्व गोष्टी असूनही आपण त्यादृष्टीने समाजाकडे पाहतो का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

सुरेश जैन म्हणाले, डोंबारी खेळ करणार्‍या कलाकारांची कायमस्वरुपी तारेवरची कसरत असते. आपल्या जीवाची बाजी लावून ते खेळ करतात. शांताबाईंनी राज्यातील विविध ठिकाणी आणि चार चित्रपटांतून डोंबारी खेळाची ही कला सादर केली आहे. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यासोबतच आर्थिक मदतही देण्यात आली.

शांताबाई पवार म्हणाल्या, जगणे किंवा मरणे हे आपल्या हातात नसते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही व्यासपीठावर कला सादर करण्याची मी संधी साधते. सिनेमांमध्ये काम करताना वेगळा अनुभव मिळाला. डोंबारी खेळ करण्याच्या कलेसोबत गाणी म्हणणे हा देखील माझा छंद आहे. ‘आमच्या हीचं प्रकरण’ हा नाटकाच्या प्रयोगदेखील यावेळी करण्यात आला. मांगिलाल सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. दीपक जैन यांनी आभार मानले.

Copy